(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मध्यप्रदेशातील झाबुवा जिल्ह्यात नोंद असलेल्या खूनप्रकरणातील फरार संशयित आरोपी रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आल्याने स्थानिक पोलिसांनी तत्पर कारवाई करत तिघांना अटक केली. ही कारवाई शहर पोलिसांच्या दक्षतेचे प्रत्यंतर देणारी ठरली आहे.
कोतवाली झाबुवा पोलीस ठाणे, जि. झाबुवा (मध्यप्रदेश) येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 340/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 191(1), 191(2), 191(3), 190, 103(1), 296(1), 351(2) अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून दाउद चिलिया वाकला, नब्बु चिलिया वाकला आणि चिलिया कलिसिंग वाकला (सर्व रा. झाबुवा, मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे. गुन्हा घडल्यानंतर हे तिघेही आरोपी फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी मध्यप्रदेश पोलिसांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हे आरोपी रत्नागिरी परिसरात लपून बसल्याचे उघडकीस आले. त्यानुसार विशेष पथक रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले.
रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने स्थानिक पातळीवर माहिती गोळा करत सापळा रचला आणि तिघांनाही अटक करण्यात यश मिळवले. अटकेनंतर पुढील तपासासाठी संबंधित आरोपींना झाबुवा (मध्यप्रदेश) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सपोफौ/708 दीपक साळवी, पोहवा/754 भालचंद्र मयेकर आणि पोकॉ/78 निलेश शिंगावे यांनी सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान, फरार आरोपींना पकडण्यासाठी विविध राज्यांतील पोलिसांमध्ये समन्वय आवश्यक असतो, याची प्रचिती या कारवाईतून पुन्हा एकदा आली आहे.

