(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी)
चिपळूण नगर परिषदेतील मालमत्ता पर्यवेक्षक सागर शेडगे यांना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी कथितरीत्या अपशब्द वापरत धमकी दिल्याचा आरोप पुढे आल्यानंतर नगर परिषद अधिकारी व कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. संबंधित प्रकरणात नगराध्यक्षांनी जाहीर व लेखी माफीनामा द्यावा, अन्यथा त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य नगरपालिका संवर्ग अधिकारी संघटनेने दिला आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. संघटनेने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना दिलेल्या निवेदनात घटनेचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. निवेदनानुसार, सागर शेडगे हे माजी सैनिक असून त्यांनी भारतीय सेनेत तब्बल वीस वर्षे सेवा बजावली आहे. नगर परिषदेत मालमत्ता पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व नियमानुसार कामकाज केले. मात्र, नगराध्यक्षांनी त्यांना आपल्या दालनात बोलावून कथितरीत्या नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव आणला. त्यास शेडगे यांनी नकार दिल्यानंतर त्यांच्याशी अपमानास्पद वर्तन करण्यात आले तसेच अशोभनीय भाषा वापरत धमकी देण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या घटनेमुळे स्वतःच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाल्याचे शेडगे यांनी संघटनेकडे नमूद केल्याचे निवेदनात म्हटले आहे. देशसेवा बजावलेल्या माजी सैनिकांशी सन्मानपूर्वक वागण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही अशा प्रकारची वागणूक देण्यात आल्याचा आरोप करत संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगराध्यक्षांनी सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याबाबत लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आवश्यक ती कारवाई करावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शेडगे यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची माजी सैनिक कोट्यातून विशेष बाब म्हणून त्यांच्या मूळ जिल्ह्यातील नगर परिषदेत बदली करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास किंवा नगराध्यक्षांकडून माफीनामा सादर न केल्यास राज्यभरातील नगरपालिका अधिकारी व कर्मचारी कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशारा संघटनेने दिला आहे. त्यामुळे या वादाकडे स्थानिक स्वराज्य संस्थांतील कर्मचारी वर्गासह प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निवेदनावर संघटनेचे राज्याध्यक्ष कैलास चव्हाण, कार्याध्यक्ष ॲड. तृप्ती भामरे, सरचिटणीस मनोज पाटील, चिटणीस आशिष हेमके, कोषाध्यक्ष अर्जुन गुट्टे, प्रसिद्धी प्रमुख राहुल कुटे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

