(दीपक पटवर्धन)
१९९३ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत एक दीर्घ लढाई यशस्वी झाली आणि ३० वर्षे मुदतीने म्हणजे २०४८ पर्यंत असणारी जागा १/- रु. चौ.मि. भुई भाड्याने वाचनालयाला शासनाने नोंदणीकृत करार व शासन आदेश माध्यमातून प्रदान केली. तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब, पालकमंत्री ना. उदय सामंत साहेब यांनी या कामी वाचनालयाला बहुमोल मदत केली आणि केवळ त्यामुळेच कठीण असा लढा यशस्वी झाला..
नव्या ठिकाणी तात्पूरते स्थलांतर
जागेचा प्रश्न सुटल्याने जीर्ण इमारतीला मुक्ती देऊन नवीन बांधकामाला नगरपरिषदेची मंजुरी तात्काळ मिळाली. नगर परिषदेने जे सहकार्य केले तेही बहुमौलिक होते. प्लॅन मंजूर झाला. आता इतकं प्रचंड सामान, पुस्तक, फर्निचर हे सर्व नेटकं ठेवून इमारत खाली करून नव्या ठिकाणी वाचनालयाची व्यवस्था करण्याच आव्हान होतं. मात्र तोही विषय मार्गी लागला आणि पाहता पाहता जुनी इमारत जमीनदोस्त करून जागा साफ केली आणि नव्या बांधकामाचे वेध लागले.
नवीन वास्तुची पायाभरणी
दि. २५ डिसेंबर २०२४ रोजी पायाभरणी करण्याचे नक्की केले व ती व्यवस्था पूर्ण झाली. श्रद्धेय अटलजींची जयंती त्यातही जन्मशताब्दीचा मुहूर्त साधत आ. रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत डॉ. श्रीरंग कद्रेकर आणि ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये यांचे हस्ते श्रीफळ वाढवून दिमाखदार कार्यक्रमाने नव्या बांधकामाची मुहूर्तशीला ठेवून नव निर्माणाच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला.तत्पूर्वी सकाळी ७.३० वाजता धार्मिक विधीयुक्त शिलापूजन करून घेतले होते.
मान्यवरांची उपस्थिती
शुभारंभाच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रत्नागिरीतील नागरिक बंधूभगिनी आवर्जून हजर होत्या. रत्नागिरीतील प्रतिथयश, नामांकित, सुसंस्कृत, अभ्यासू जनांचा जणू मेळा म्हणावा असा हा कार्यक्रम होता. समाजात ज्यांची प्रतिमा आहे, रचनात्मक काम आहे अशा व्यक्तींची मोठ्या संख्येने असणारी उपस्थिती ही मला नवी उर्जा देणारी वाटली. ३ कोटी ५० लाखांचा हा प्रोजेक्ट त्यातही केवळ २ वर्षात म्हणजे १४ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्णत्वास नेऊन द्विशताब्दी महोत्सवासाठी हे वाचनालय परत सिद्ध करण्याचं आव्हान सोपं नसल्याने पायाभरणीच्या कार्यक्रमास केवळ एक दिवस आधी मी स्वतः निमंत्रण केल्यानंतर आवर्जून आलेली ही प्रतिथयश मंडळी ही रत्नागिरीच्या सुसंस्कृतपणाची जागती ओळख म्हणावी लागेल. वाचनालयाचे काम महत्त्वाचे मानणारा हा वर्ग व वाचनालयाची त्यातही ग्रंथांची महती जाणणारा हा वर्ग अशा समूहाची जाणीवपूर्वक असलेली उपस्थिती ही वाचनालयाची नवी वास्तू उभी करताना सर्व रत्नागिरीकर बरोबर राहतील हा विश्वास जागवणारी होती.
राजकीय नेतृत्वाचे भरीव योगदान
वाचनालयाचा हा प्रोजेक्ट ३ कोटी ५० लाखांचा आहे. ना. उदय सामंत, आ.रवींद्रजी चव्हाण यांनी भरीव मदत केली आहे. आमच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाख जमा झाले आहेत. म्हणजे अजून २ कोटी ३० लाख उभे करायचे आहेत हे शिवधनुष्य आहे.
तारेवरची कसरत
असलेली जीर्ण वास्तू पाडण्याशिवाय पर्याय नव्हता. द्विशताब्दी समिप आलेली असताना नवनिर्माण त्या कालावधीत पूर्ण करण्याची अनिवार्यता, १ लाख १५ हजारांची अमुल्य ग्रंथ संपदा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी, नवनिर्माण पूर्णत्वास जाईपर्यंत पर्यायी जागी वाचकांना ग्रंथ संपदा उपलब्ध करून देण्याच आव्हान या सर्व गोष्टी करताना खूप तारेवरची कसरत करावी लागली पण यश आलं. कारण सद्भावना साथ देत होत्या.
वाचक वर्गाच्या व नागरिकांचे सहकार्याची अपेक्षा
कोणतेही वाचनालय केवळ वाचक जी वर्गणी देतात त्यावर आणि शासनाच्या अनुदानावर भक्कम आर्थिक पायावर उभे राहू शकत नाही. ही साधने अत्यंत तोकडी ठरतात. त्यासाठी व्यवस्थापक मंडळाने, पदाधिकाऱ्यांनी कंबर कसावी लागते. आपल्या प्रयत्नातून निधी संकलित करण्याचा पर्याय अवलंबावा लागतो. स्वाभाविकच वाचक वर्गानेही आपल्या ग्रंथालयासाठी स्वेच्छेने काही आर्थिक सहयोग देणे हे अभिप्रेत ठरते. केवळ वाचक वर्ग नव्हे तर समस्त समाजाने आपापल्या परीने या नववास्तु निर्मितीसाठी योगदान उभे केले तर द्विशताब्दी साजरी करताना महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीची शान असणारे हे सर्वात जुने वाचनालय, सर्वात अद्ययावत वाचनालय म्हणून जगासमोर येईल. रत्नागिरीची सुसंस्कृत ओळख यामुळे अधिक दृढ होईल.
वाचनालयाचा आराखडा
वाचनालयाची इमारत दुमजली असणार आहे. तळमजल्यावर ४ हजार चौ.फू. जागेत पुस्तके मांडणी विभाग, ग्रंथालय विभाग व स्वागत कक्ष असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह राहणार असून, दुसऱ्या मजल्यावर अभ्यासिका, बाल व महिला वाचक विभाग व मुक्त वाचनालय विभाग असणार आहे. डिजिटल लायब्ररी संकल्पनेसाठी स्वतंत्र साधनांनी युक्त विभाग हे या नवनिर्माणाचे वैशिष्ट्य ठरेल असे प्रारूप आपल्यासमोर सादर करताना काही स्मृती कक्ष, स्मृती दालन, साहित्यिक श्रेष्ठींचे फोटो व माहिती प्रदर्शित करणारी व्यवस्था, निधीमध्ये लक्षणीय योगदान देणाऱ्या आश्रयदात्यांची नावे प्रदर्शित करण्याची वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दृढ विश्वास
१८२८ साली स्थापन झालेले हे वाचनालय नव्या स्वरूपात उभ करताना हे सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करू. सर्वांचे सहकार्य घेत हा मोठा प्रकल्प तडीस जाईल हा विश्वास इतकी सव्यापसव्य पार पडल्यामुळे आता नक्की निर्माण झालाय..