(नवी मुंबई/ रत्नागिरी | प्रतिनिधी)
समाजात “डॉक्टर” हा शब्द श्रद्धेचा मानला जातो. पण या सन्मानास काही विकृत डॉक्टर काळीमा फासतात. अशाच एका डॉक्टरच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून एका तरुणीचे आयुष्य उध्वस्त झाले. डॉ. नोमान इब्राहिम अत्तार (३६) याच्याविरोधात फसवणूक आणि शारीरिक शोषणाच्या गंभीर आरोपांनंतर १७ जून २०२५ रोजी रबाळे एमआयडीसी, नवी मुंबई येथे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला प्रियंका (वय ३२) हिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, डॉ. अत्तारने २०२३ मध्ये ऑनलाइन सोशल मीडिया ॲपवरून ओळख वाढवत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर लग्नाचे खोटे आश्वासन देत १५ व १६ जुलै रोजी महापे एमआयडीसीमधील हॉटेलमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. नंतरही पीडितेच्या घरी तर तळोजा येथील आपल्या राहत्या घरी असे संबंध सुरू राहिले. ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रियंका गर्भवती राहिल्यानंतर, डॉ. अत्तारने लग्नासाठी वेळ देण्यास सांगितले. मात्र, त्याने औषध देऊन गर्भपातासाठी भाग पाडल्याचा आरोप तिने केला आहे. मानसिकदृष्ट्या खचलेली असतानाही प्रियंका त्याच्यासोबत संबंध ठेवत होती. तो दरमहा तिच्या खर्चासाठी पैसेही देत होता.

दरम्यान, डिसेंबर २०२४ मध्ये डॉ. अत्तारने चिपळूण येथे स्वतःची ओपीडी सुरू केली आणि प्रियंका त्याला सोशल मीडिया मार्केटिंग कामासाठी मदत करत होती. परंतु, डॉ. अत्तारचे हेतू केवळ शारीरिक गरजा भागवण्यापुरतेच असल्याचा आरोप प्रियंकाने केला आहे. या संपूर्ण मानसिक त्रासामुळे २६ मे २०२४ रोजी प्रियंकाने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. शेवटचा शारीरिक संबंध २४ फेब्रुवारी २०२५ रोजी झाल्याचे तिने नमूद केले आहे. पुढे ४ एप्रिल रोजी चिपळूणमध्ये झालेल्या हेल्थ कॅम्पमध्ये डॉ. अत्तार एका मुस्लिम महिलेसोबत दिसला आणि दरम्यान, त्याने तिच्याशी लग्न केल्याचे उघड झाले. ही माहिती दुबईत असताना प्रियंकाला मिळाली आणि तिला आपली फसवणुक झाल्याची जाणीव झाली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ६९ (फसवणूक) आणि कलम ८९ (शारीरिक शोषण) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.

डॉ. नोमान अत्तार सध्या न्यायालयीन कोठडीत
फसवणूक आणि शारीरिक शोषणाच्या गुन्ह्यात अटकेत असलेला डॉ. नोमान इब्राहिम अत्तार सध्या तळोजा येथील न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ जुलै २०२५ रोजी होणार आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, पीडितेच्या तक्रारीतील आरोपांची चौकशी सखोलपणे केली जात आहे, असे पोलिस उपनिरीक्षक राहुल सत्यवान गरड यांनी सांगितले.


