(रत्नागिरी / प्रतिनिधी)
व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलेल्या पोस्टचा राग मनात धरून कर्णबधिर आणि अंधत्वाचे दिव्यांगत्व असलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन मारहाण केल्याची घटना रत्नागिरी एमआयडीसी परिसरात घडली. स्टिल आर्ट इंडस्ट्रीज येथील कंपनीच्या प्रवेशद्वारात शिरून हाताच्या थापटाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चार नामनिर्देशित व्यक्ती आणि एका अनोळखी महिलेविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकृष्णा देविदास शिर्सेकर (वय ४३, रा. नाचणे, शांतिनगर, रत्नागिरी) हे खासगी नोकरी करतात. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ते एमआयडीसीतील डी-१२ येथील स्टिल आर्ट इंडस्ट्रीजमध्ये कामावर असताना हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादी यांनी ‘पंचक्रोशी समाचार’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट टाकली होती. या पोस्टचा राग मनात धरून त्यांची भावजय सिद्धी विनायक शिर्सेकर, साक्षी शशांक शिरवडकर, शशांक विजय शिरवडकर, राहुल जगदीश करगुटकर आणि त्यांच्यासोबत आलेली एक अनोळखी महिला कंपनीत आल्याचा आरोप आहे. संबंधित महिलेने पंजाबी पोशाख परिधान केला होता आणि चेहऱ्याभोवती ओढणी बांधली होती, असेही तक्रारीत म्हटले आहे.
आरोपींनी कंपनीच्या प्रवेशद्वारात शिरून आपल्याला हाताच्या थापटाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे शिर्सेकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या मारहाणीत त्यांच्या डोळ्यावरील चष्मा तुटून नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १८९(२), १९१(२), ११५(२), ३२४(२) तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ९२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.


