(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा सुतारवाडी येथे चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करत तब्बल १० तोळे सोन्यासह ५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी उशिरा रात्री घडली. या प्रकरणी मृणाल महेश पांचाळ (वय ४८, रा. हातखंबा सुतारवाडी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारच्या मध्यरात्री चोरट्यांनी पांचाळ यांच्या बंद घराची खिडकी फोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उचकटून त्यामधील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ५.७६ लाख रुपयांचा ऐवज त्यांनी लंपास केला. रविवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर घरमालकांनी तत्काळ गावच्या पोलीस पाटील व रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचे पथक, श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून आवश्यक पुरावे गोळा केले. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांच्या हालचालींचा तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरी तालुक्यात घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असून, हातखंबा परिसरात सलग घरफोड्यांच्या घटना नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण करत आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

