(खेड /रत्नागिरी)
मालवाहतूक करणाऱ्या डाउन गुड्स रेल्वेगाडीची धडक बसून ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील शिव बुद्रुक भोईवाडी परिसरात घडली. निलेश दत्ताराम लवंडे (वय ४२, रा. शिव बुद्रुक भोईवाडी, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. २८ ऑक्टोबर रोजी रात्री ११.२५ वाजण्यापूर्वी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, खेडकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर मैल क्रमांक १०६/०७ पासून सुमारे ५० मीटर अंतरावर लवंडे यांचा मृतदेह आढळून आला. डाउन गुड्स मालवाहतूक रेल्वेगाडीची धडक बसल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच उजवा पाय मांडीपासून तुटला होता. शरीरावरही लहान-मोठ्या जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीत नमूद आहे. या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८९/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. निलेश लवंडे यांच्या मृत्यूमुळे शिव बुद्रुक भोईवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेबाबत खेड पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.


