(संगमेश्वर / प्रतिनिधी )
प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. पाचवीतील विजय लालासो टकले आणि आठवीतील प्रज्ञा गणपत कांबळे या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. प्रशाला आणि संस्थेतर्फे या दोन्ही विद्यार्थ्यांना आज संस्था सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
गतवर्षी पाचवी शिकणाऱ्या विजय लालासो टकले याची नवोदय विद्यालयासाठी देखील निवड झाली असून सदर विद्यार्थी अभ्यासासह कला – क्रीडा अशा विविध क्षेत्रात नेहमी अग्रेसर असतो. प्रज्ञा गणपत कांबळे या विद्यार्थिनीला देखील एन एम एम एस परीक्षेची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. प्रशालेचे दोन्ही विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आल्यामुळे आज संस्था आणि प्रशालातर्फे संस्था सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांच्या हस्ते मार्गदर्शक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांना देखील सन्मानित करण्यात आले. संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे यांनीही विजय टकले आणि प्रज्ञा कांबळे यांचे आणि मार्गदर्शक शिक्षक अभिनंदन केले आहे.

