गुजरातमधील वडोदरा शहरात एकाच कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलगी अशा तिघांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. मांडवी परिसरातील ‘डाला पटेल की पोल’ येथील घरात आरतीबेन सोनी (वय ५०), त्यांचा मुलगा नीलकंठ सोनी (वय २४) आणि मुलगी झलक उर्फ जेनी सोनी (वय २२) यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून तीन पानी चिठ्ठी जप्त केली असून, त्यातून कुटुंबाच्या आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक दुःखाची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, व्यवसायातील सातत्याने होणारा तोटा, अंदाजे ३३ ते ३५ लाख रुपयांचे कर्ज आणि कुटुंबातील सदस्यांच्या एकापाठोपाठ झालेल्या निधनांमुळे निर्माण झालेला तीव्र मानसिक तणाव, या पार्श्वभूमीवर कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चिठ्ठीतून समोर आले आहे. कुटुंबाचा आयुर्वेदिक रुग्णालय आणि आरोग्यसेवा व्यवसाय पुन्हा उभा राहावा, आर्थिक संकट दूर व्हावे, यासाठी त्यांनी अनेक नवस केले होते. व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस यावेत, या आशेने झलकने ‘श्री राम’ हे नाव एक लाख वेळा लिहिल्याचाही उल्लेख चिठ्ठीत आहे.
सोनी कुटुंबाने सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी ओल्ड पादरा रोडवर ‘जॅप्स हेल्थ केअर’ नावाने आयुर्वेदिक रुग्णालय आणि क्लिनिक सुरू केले होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे व्यवसाय न चालल्याने तोटा वाढत गेला आणि कुटुंबावरील कर्जाचा बोजा अंदाजे ३३ ते ३५ लाख रुपयांपर्यंत पोहोचला. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी स्वतःचे घरही विकले होते. त्यानंतरही आर्थिक अडचणी कायम होत्या. गाडीचे दोन महिन्यांचे हप्तेही थकले होते.
दरम्यान, आरतीबेन यांच्यावर वैयक्तिक दुःखांचाही मोठा आघात झाला होता. पती, आई-वडील आणि भावाच्या अकाली निधनामुळे त्या तीव्र मानसिक तणाव आणि नैराश्यात असल्याचे चिठ्ठीतून स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येते. पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाची तसेच व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली होती.
या प्रकरणाची माहिती देताना एसीपी जी. बी. बाभानिया यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालानुसार आई, मुलगा आणि मुलगी या तिघांच्याही मृत्यूचे प्राथमिक कारण गळफास असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, मृत्यूची इतर संभाव्य कारणे तपासण्यासाठी तिघांच्या अवयवांचे नमुने न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेकडे (एफएसएल) पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोन आणि अन्य डिजिटल उपकरणेही जप्त करून तपासणीसाठी पाठवली आहेत. तीन पानी चिठ्ठीत नमूद केलेल्या आर्थिक व्यवहारांची तसेच संबंधित व्यक्तींची चौकशीही सुरू आहे.


