(गणपतीपुळे / वैभव पवार)
श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांच्या सुप्रसिद्ध श्री लंबोदर गणपती मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय सामवेद स्वाहाकार सोहळ्याची रविवारी, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्णाहुतीने सांगता झाली. समस्त ब्रह्मवृंद गणपतीपुळे यांच्या नियोजनातून पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हिंदू धर्मातील चार प्रमुख वेदांपैकी सामवेदाला विशेष महत्त्व आहे. संगीत, उपासना आणि मंत्रगायन यांच्याशी या वेदाचा प्रामुख्याने संबंध आहे. ‘साम’ म्हणजे गायन किंवा मनाची शांती, तर ‘वेद’ म्हणजे ज्ञान. सामवेदामध्ये मंत्रसंहितेचा अर्चिक हा भाग आणि मंत्रांच्या गायनाचा गान हा दुसरा भाग आहे. सामवेदाच्या कौथुमीय, राणायनीय आणि जैमिनीय या तीन प्रमुख शाखा सध्या प्रचलित आहेत. गणपतीपुळे येथे राणायनीय संहिता शाखेचा स्वाहाकार विधी संपन्न झाला.
बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू झालेला हा धार्मिक सोहळा रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता (आश्विन शुद्ध ११ ते आश्विन शुद्ध १४, शके १९४८) पूर्ण झाला. यापूर्वी गणपतीपुळे येथील समस्त ब्रह्मवृंदांच्या माध्यमातून ऋग्वेद आणि यजुर्वेद स्वाहाकारही संपन्न झाले आहेत. या सामवेद स्वाहाकारासाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या सोहळ्याचे मुख्य आचार्य वेदमूर्ती श्री तुकाराम मुळे गुरुजी (अहिल्यानगर) यांनी पौरोहित्य आणि मार्गदर्शन केले. त्यांचे विद्यार्थी व शिष्यगण वे.मू. दत्तदास शेवडे गुरुजी (लांजा), वेदवित् मुळे (अ.नगर), सचिन व्यास (नीमच, म.प्र.), जयप्रकाश शर्मा (नीमच, म.प्र.) आणि अभिषेक शर्मा (भीलवाडा, राजस्थान) यांनी मंत्रजागर व पौरोहित्याची जबाबदारी पार पाडली. सौ. सुहिता आणि डॉ. चैतन्य वासंती वामन घनवटकर या दांपत्याने ब्रह्मवृंदांचे यजमान प्रतिनिधी म्हणून संकल्प व कार्यपूर्ती केली.
या धार्मिक अनुष्ठानादरम्यान भारत देश, सनातन धर्म, भारतीय सैनिक आणि नागरिक यांच्यासह सर्वांच्या कल्याणासाठी विविध विस्तृत संकल्प आणि प्रार्थना करण्यात आल्या. सामवेदातील मंत्रांचे लयबद्ध पठण, गायन आणि स्वाहाकार विधी यामुळे श्री गणपती मंदिर परिसरात श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिकतेने भारलेले पवित्र वातावरण निर्माण झाले होते.
पाच दिवस चाललेल्या या सामवेद, मंत्र, ज्ञान, गायन आणि भक्तीच्या सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. धार्मिक परंपरा आणि वैदिक संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारा हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
यापुढेही सर्वांचे असेच सहकार्य लाभावे आणि सर्वांच्या सहभागातून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने होत राहावे, अशी भावना संस्थान श्रीदेव गणपतीपुळे, आयोजक समस्त ब्रह्मवृंद गणपतीपुळे आणि भक्तगण यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.


