(जैतापूर / वार्ताहर)
जैतापूर (ता. राजापूर) येथील जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आमदार किरण उर्फ भय्याशेठ सामंत सन्मान चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२५-२६ आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा दिनांक २६ ते २७ जुलै २०२५ या कालावधीत काझी मल्टीपर्पज हॉल, होळी, जैतापूर येथे पार पडणार आहे. जिल्हा पातळीवरील मानांकनासाठी आयोजित ही स्पर्धा यंदाच्या वर्षातील दुसरी महत्त्वाची स्पर्धा ठरणार आहे.
या स्पर्धेत एकूण सात गटांमध्ये सामने खेळवले जाणार असून त्यामध्ये पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट आणि किशोरी गट यांचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २०२५-२६ या वर्षासाठी सर्व स्पर्धकांनी रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनकडे नामनोंदणी शुल्क म्हणून ५० रुपये भरावे लागतील. याशिवाय, प्रवेश फी पुरुष आणि महिला गटासाठी १५० रुपये, दुहेरी गटासाठी २०० रुपये तर लहान वयाच्या गटांसाठी १०० रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांची नोंदणी झाल्यासच तो गट खेळवला जाणार आहे. अन्यथा संबंधित गटाची स्पर्धा रद्द करण्यात येईल, हे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. सर्व स्पर्धकांनी आपली प्रवेशिका २३ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासह जमा करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट किंवा शर्ट परिधान करणे बंधनकारक असून, यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तसेच, यावर्षीपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डावर तीन सेट अशा पद्धतीने खेळवले जाणार आहेत.
या स्पर्धेत विजेत्यांना रोख पारितोषिक, आकर्षक सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धेचे संचालन राष्ट्रीय पंच श्री. साई प्रकाश कानिटकर व राज्यस्तरीय पंच श्री. सागर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे, तर स्पर्धा प्रमुख म्हणून श्री. एकनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुकानिहाय प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली असून स्पर्धकांनी आपल्या तालुक्याच्या प्रतिनिधीकडे संपर्क साधून नोंदणी करावी. गुहागरसाठी श्री. प्रदीप परचुरे, रत्नागिरीसाठी श्री. विनायक जोशी, देवरूखसाठी श्री. राहुल भस्मे व श्री. मोहन हजारे, चिपळूणसाठी श्री. प्रकाश कानिटकर व श्री. दीपक वाटेकर, संगमेश्वरसाठी श्री. मनमोहन बेंडके, लांजासाठी श्री. मनोज जाधव, खेडसाठी श्री. योगेश आपटे, राजापूरसाठी श्री. मनोज सप्रे आणि दापोलीसाठी श्री. माधव शेट्ये हे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतील.
या स्पर्धेला अधिकाधिक प्रतिसाद मिळावा यासाठी आयोजक मंडळाचे अध्यक्ष श्री. गिरीश सखाराम करगुटकर, सचिव राकेश दांडेकर, उपाध्यक्ष श्रीकृष्ण राऊत, खजिनदार सुनिल करगुटकर, सहसचिव प्रसाद माजरेकर यांच्यासह रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्ष श्री. प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष श्री. सुरेंद्र देसाई, सल्लागार श्री. सुचय अण्णा रेडीज, सचिव श्री. मिलिंद साप्ते आणि खजिनदार श्री. नितीन लिमये यांनी सर्व कॅरमप्रेमींना आवाहन केले आहे की त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा व स्पर्धा यशस्वी करावी.

