(पिंपरी चिंचवड / वृत्तसंस्था)
थेरगावमधील डांगे चौक परिसरातील सिग्नेचर पार्क सोसायटीत शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. एकता मनोज भांगड (वय ३३) आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा माधव यांचा इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. प्राथमिक तपासात आईने मुलासह आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत आजारपणाला कंटाळल्याचा उल्लेख असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली. या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज भांगड (वय ३५) हे येरवडा येथील एका नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. ते पत्नी एकता आणि मुलगा माधव यांच्यासह गेल्या दोन वर्षांपासून सिग्नेचर पार्क सोसायटीत राहत होते. हे कुटुंब मूळचे राजस्थान येथील असून, एकता गृहिणी होत्या.
शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजता मनोज कामानिमित्त येरवडा येथे गेले होते. त्यावेळी घरात एकता आणि माधव हे दोघेच होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इमारतीच्या अंतर्गत डक्टमधून मोठा आवाज झाल्याने रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता महिला आणि मुलगा खाली पडलेल्या अवस्थेत आढळले. रहिवाशांनी तातडीने पोलिसांना कळवले. माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, एकता मुलाला सोबत घेऊन लिफ्टने थेट १८ व्या मजल्यावर गेल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी त्यांनी चप्पल काढून ठेवल्याचेही फुटेजमध्ये आढळले. त्यानंतर दोघे खाली पडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली. आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत असून, ‘माझ्या मुलाला माझी आठवण येईल. त्यामुळे त्याच्यासह आत्महत्या करीत आहे,’ असा मजकूर त्यात असल्याचे वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले. आजारपणामुळे आलेल्या नैराश्याचा तसेच स्वतःनंतर मुलाचं काय होईल, या चिंतेचा उल्लेखही नोटमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी अद्याप स्पष्ट झालेली नाही. वाकड पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून, पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) पाठवण्यात आले आहेत. घटनेची माहिती त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आली असून, घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांकडून पंचनामा आणि पुरावे संकलित करण्याचे काम सुरू असून, या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.


