( रत्नागिरी / वार्ताहर )
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (नागपूर) या संस्थेकडून राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेत रत्नागिरी तालुकास्तरावर फाटक हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. हरवलेली शाळा या नाटिकेची निवड आता जिल्हास्तरासाठी झाली आहे.
तालुका विज्ञान मंडळाकडून या स्पर्धेचे नियोजन उद्यमनगर येथील कॉन्व्हेंट स्कूलमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत फाटक हायस्कूलमधील इयत्ता सहावी ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी विज्ञान नाट्यलेखन व दिग्दर्शन शाळेतील शिक्षक मोहन बापट यांनी केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता – मित्र, साधन की धोका ? या विषयावर हा नाटिका साकारली. इरा गोखले, अवंती लिमये, विघ्नेश जोशी, मिहीर खाडीलकर, मेघना मलुष्टे, चिन्मय दामले, अंश पाटील, मानस पिलणकर हे विद्यार्थी या नाटिकेत सहभागी झाले होते. तसेच अर्णव पटवर्धन या विद्यार्थ्याने या नाटिकेसाठी पार्श्वसंगीत दिले. या नाटिकेसाठी शिक्षक श्री. वळवी यांचेही सहकार्य लाभले.
स्पर्धेचे परीक्षण सौ. नेहा उकिडवे (दामले विद्यालय) आणि सौ. संघमित्रा कुरतडकर (निवळी हायस्कूल) आणि सौ. आकांक्षा भुर्के, (कुवारबाव उत्कर्षनगर) यांनी केले. या यशाबद्दल फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक राजन कीर, संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर, कार्याध्यक्ष दाक्षायणी बोपर्डीकर व सचिव राजीव गोगटे व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.


