(शहापूर)
शहापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये विद्यार्थिनींशी अमानवीय आणि लज्जास्पद प्रकार घडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे काही थेंब आढळल्याने शाळा प्रशासनाने अतिशय चुकीच्या पद्धतीने चौकशी केली. आठवी ते दहावीच्या वर्गातील 10 ते 12 विद्यार्थिनींना जबरदस्तीने बाथरूममध्ये नेऊन त्यांच्या अंतरवस्त्रांची तपासणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. तसेच या तपासण्यासाठी सहावी ते दहावीच्या सव्वाशे विद्यार्थिनींचे गणवेश काढण्याचा प्रकारही झाल्याचे पालकांनी सांगितले.
या बाबत पत्रकारांनी पालकांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, शाळेच्या बाथरूममध्ये साफसफाई करताना शिपाई मावशीला रक्ताचे काही थेंब आढळले. दरम्यान, शाळेत पाण्याची कमरता होती. त्यामुळे हा प्रकार झाला असून शकतो, असं पालकांचं म्हणणे आहे. संबंधित मावशीने ही माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकांना दिल्यानंतर, त्यांनी विद्यार्थिनींची चौकशी करण्याचे आदेश दिले. यानुसार, मावशीने आठवी ते दहावीच्या वर्गातील काही मुलींना बाथरूममध्ये नेले आणि त्यांचे कपडे उतरवून तपासणी केली. यानंतर 8 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 च्या सुमारास मुख्यध्यापिकांनी मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावले. त्यानंतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर आणि बाथरुमच्या लादीवरील रक्ताचे डाग असलेले फोटो प्राजेक्टरवर दाखवले. विद्यार्थिनींच्या बोटाचे ठसे ही घेतले असल्याचा आरोप पालकांनी केला. या प्रकारामुळे विद्यार्थिनींनी घरी जाऊन पालकांना घडलेल्या प्रकाराची सर्व माहिती दिली.
पालकांचा संताप; शाळेत मोर्चा
ही माहिती मिळताच संतप्त पालकांनी शाळेवर धडक देत मुख्याध्यापकांना जाब विचारला. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात जोरदार वाद झाला. प्रशासनाने सोमवारपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र मंगळवार उलटूनही कारवाई झाली नव्हती. परिणामी पालकांनी पुन्हा एकदा शाळेवर मोर्चा काढला. विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक दबाव टाकत विद्यार्थिनींसोबत अत्यंत खालची पातळी गाठल्याच्या आरोप पालकांनी केला आहे.
मुख्याध्यापिकेसह मावशी आणि शिक्षक अटकेत; मुख्याध्यापिकेचे निलंबन
शाळेत अधिकृत प्रशासनिक व्यक्ती अनुपस्थित असल्याने पालकांचा आक्रोश अधिकच वाढला. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन मुख्याध्यापकांना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. पालकांचा मोर्चा पोलीस ठाण्यावर पोहोचला, गुन्हा दाखल न होईपर्यंत ते हलणार नसल्याची भूमिका पालकांनी घेतली होती. शाळेचे विश्वस्त येईपर्यंत व मुख्याध्यापकांना निलंबित करेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार पालकांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषद गट शिक्षणाधिकारी रामचंद्र विशेष यांना पालकांनी घेराव घालून विचारले की, प्रशासनावर तुमचा काही अंकुश आहे की नाही? शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई सुरू असल्याचे सांगितले, मात्र शाळा प्रशासन त्यांचे फोन उचलत नसल्याचे सांगताच पालक अधिकच संतप्त झाले.
या प्रकरणी पोलिसांनी एकूण आठ जणांविरुद्ध POSCO (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये मुख्याध्यापक, दोन विश्वस्त, चार शिक्षक आणि एक शिपाई मावशी यांचा समावेश आहे. मुख्याध्यापिका आणि शिपाई मावशी यांना अटक करण्यात आली असून, मुख्याध्यापिकांना निलंबितही करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे यांनी दिली आहे. पोलिसांनी त्वरित आणि गंभीर दखल घेतल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

