(मुंबई)
महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज बोलता आणि समजता यावी यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबविण्यात येणार असून यासाठी तब्बल 4500 शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबविण्यात येणार असून या मोहिमेसाठी तब्बल 4500 शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत ही माहिती दिली. या उपक्रमासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या शिक्षकांना शासनाकडून मानधन दिले जाणार आहे. यासाठी आवश्यक निधीची तरतूदही करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली.
या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, वरिष्ठ अधिकारी तसेच विविध रिक्षा-टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चालकांना मराठी भाषा सहज बोलता, समजता आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
दररोज 4 तासांचे प्रशिक्षण
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी दररोज चार तासांचे ऑफलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये व्यवहारिक मराठी आणि संभाषण कौशल्य विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर ऑनलाइन प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
‘या’ शहरांमध्ये प्रथम टप्प्यात वर्ग
मुंबई, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, पालघर आणि डहाणू या भागांमध्ये प्रथम टप्प्यात विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. विविध शाखा कार्यालयांमध्ये हे वर्ग घेण्यात येतील. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातूनही मराठी शिकविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
परीक्षा आणि प्रमाणपत्र
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चालकांची मौखिक परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या चालकांना शासनाकडून अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हिंदी ते मराठी भाषांतर आणि सोपे मराठी संभाषण शिकण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ऑनलाइन ॲपही उपलब्ध करून दिले जाणार आहे. या ॲपच्या मदतीने चालकांना मराठी शब्द, वाक्यरचना आणि दैनंदिन संवाद सहज शिकता येणार आहे.
15 ऑगस्ट 2026 अंतिम मुदत
मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल तसेच राज्यात मराठी भाषेचा वापर आणि प्रसार मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

