(मुंबई)
वादग्रस्त कृषीमंत्री मणिकराव कोकाटे यांना अखेर रमीचा डाव चांगलाच महागात पडला आहे. गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल जाहीर केला. दत्तात्रय भरणे हे आता महायुती सरकारचे नवे कृषीमंत्री असतील, हे निश्चित झालं आहे. तर मणिकराव कोकाटेंकडे क्रीडा व युवक कल्याण खाते देण्यात आलं आहे.
कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून ते दत्तात्रय भरणेंकडे सोपवण्यात आलं आहे. याऐवजी कोकाटेंना भरणेंकडचं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय देण्यात आलं. विधानसभेत रमी खेळल्याच्या प्रकरणानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत, हे वर्तन अयोग्य असल्याचं स्पष्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवारांना योग्य संदेश दिला होता. त्यानंतर अजित पवारांनी कोकाटेंना मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आपल्या दालनात बोलावून समज दिली होती. यानंतर कोकाटे काहीसे शांत झाल्याचं पाहायला मिळालं.
सभागृहात ‘रमी’चा खेळ, राज्यात वातावरण तापलं
माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळ सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर (एक्स) हँडलवर पोस्ट केला. त्यानंतर विरोधकांनी सरकारची कोंडी करण्यास सुरुवात केली. कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. राजकीय वर्तुळात कोकाटेंचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा सुरू असतानाच, फक्त त्यांचं खाते बदलून प्रकरण थंड करण्याचा निर्णय घेतला गेल
आधी धनंजय मुंडे आणि आता मणिकराव कोकाटे, काही महिन्यांत अजित पवारांच्या गटावर दोनदा महत्त्वाच्या खात्यांत खांदेपालट करण्याची वेळ आली आहे. रमी प्रकरणामुळे राज्यात वातावरण तापलेलं असताना, विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत घेराव घालण्याचा प्रयत्न केला. राजीनामा न घेता फक्त डिमोशन (खातेबदल) करण्यात आल्यानं, कोकाटेंनी हा निर्णय काहीसा दिलासादायक मानायला हवा, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.
मणिकराव कोकाटे हे यापूर्वीही अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. एकदा त्यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान करून वाद ओढावला होता. त्या वेळी पक्षाने कोणतीही कठोर कारवाई केली नव्हती. यंदाच्या अधिवेशनात सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यावरही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील वक्तव्य केलं, त्यामुळे टीकेची लाट पुन्हा उसळली. त्यानंतर मात्र कोकाटे शांत राहिल्याचं पाहायला मिळालं. अखेर गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्या खात्याबाबत निर्णय जाहीर करण्यात आला. कृषी खातं आता अजित पवारांचे विश्वासू समजले जाणारे दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे, तर कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय देण्यात आलं आहे.
खातेबदल म्हणजेच कारवाई?
“खाते बदल म्हणजेच कारवाई मानायची का?” असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी उपरोधिक टिप्पणी करत म्हटलं आहे, “आता महायुती सरकारने रमीला राज्य खेळाचा दर्जा द्यावा आणि सत्ताधारी नेते-मंत्र्यांना सभागृहात पत्ते घेऊन जाण्याची परवानगी द्यावी.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “हा महायुतीचा अंतर्गत निर्णय असून मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी चर्चा करून घेतलेला निर्णय योग्यच असेल.”