(मुंबई)
ज्येष्ठ निर्माते, छायाचित्रकार आणि दूरदर्शन क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व प्रेम सागर यांचं रविवारी सकाळी दहा वाजता निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी आपल्या कलात्मक दृष्टिकोनातून भारतीय कला, संस्कृती आणि परंपरा यांना नवसंजीवनी दिली होती.
चित्रपटसृष्टीतील सुरुवात आणि कामगिरी
प्रेम सागर यांनी १९६८ साली पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथून पदवी संपादन केली. १९७० साली ‘ललकार’ या चित्रपटाच्या छायांकनातून त्यांनी चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू केला. सागर आर्ट्सच्या माध्यमातून त्यांनी ‘चरस’, ‘हमराही’, ‘प्यारा दुश्मन’, ‘अरमान’, ‘जलते बदन’, ‘बादल’, ‘प्रेम बंधन’, ‘सलमा’, ‘आँखें’ यांसारख्या चित्रपटांत छायाकार किंवा तांत्रिक सल्लागार म्हणून काम केलं. विशेषतः ‘चरस’ चित्रपटात अभिनेत्री हेमा मालिनी यांचं ग्लॅमरायझेशन हे त्यांच्या सौंदर्यदृष्टीचं उत्तम उदाहरण मानलं जातं. ‘हम तेरे आशिक हैं’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं, ज्यात जितेंद्र आणि हेमा मालिनी प्रमुख भूमिकेत होते.
भारतीय दूरदर्शनवरील प्रभावी योगदान
प्रेम सागर यांचं नाव विशेषतः भारतीय टेलिव्हिजनमधील ऐतिहासिक आणि धार्मिक मालिकांमुळे घराघरात पोहोचलं. ‘विक्रम और बेताल’ या पहिल्या भारतीय फँटसी मालिकेची निर्मिती त्यांनी केली, जी प्रचंड गाजली. त्यानंतर त्यांनी वडील रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत क्रिएटिव्ह आणि विपणन प्रमुख म्हणून काम केलं. या मालिकेने दूरदर्शनसाठी टीआरपी आणि व्यवसायाच्या दृष्टीने ऐतिहासिक यश मिळवलं.
यानंतरच्या काळात ‘श्री कृष्ण’, ‘साई बाबा’, ‘पृथ्वीराज चौहान’, ‘चंद्रगुप्त मौर्य’, ‘जय माँ दुर्गा’, ‘महिमा शनि देव की’, ‘जय जय जय बजरंग बली’, ‘बसेरा’ यांसारख्या अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक मालिकांमधून त्यांनी भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं. २०२४ मध्ये त्यांनी ‘काकभुशुंडी रामायण – अनसुनी कथाये’ या मालिकेच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली. ही मालिका आधुनिक काळातील रामायण सादर करण्याचा अभिनव प्रयत्न होता.
अनेक पुरस्कारांनी गौरव
छायाचित्रण क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना १५ हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. यात रॉयल फोटोग्राफिक सोसायटी (UK), फेडरेशन इंटरनॅशनल डी ल’आर्ट्स फोटोग्राफिक (पॅरिस), ओरेगॉन स्टेट फेअर (रौप्य), सॅन्टिएगो (कांस्य) आणि युनेस्को या संस्थांचा समावेश होता. २००९ साली त्यांना इंडियन टेलिव्हिजन अकादमी लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं.

