इंदिरापुरम (उत्तर प्रदेश)
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज यश दयाल याच्याविरोधात लैंगिक छळ आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरापुरम पोलिस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून, यासंदर्भात चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळाचा आरोप
तक्रारदार युवती ही इंदिरापुरम परिसरात राहणारी असून, तिने लग्नाचे आमिष दाखवून यश दयालने लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत केला आहे. पीडितेने काही दिवसांपूर्वी IGRS (Integrated Grievance Redressal System) पोर्टलवर तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली होती.
इलेक्ट्रॉनिक पुरावे पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने यश दयालसोबतचे इंस्टाग्राम चॅट्स, तसेच अन्य सोशल मीडियावरील संभाषणांचे स्क्रीनशॉट व इतर पुरावे पोलिसांना सादर केले आहेत. तसेच, यश दयालचे इतर मुलींशीही संबंध होते आणि त्यांनी फसवणूक केली, असा आरोपही पीडितेने केला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना डीसीपी ट्रान्स हिंडन निमिष पाटील यांनी सांगितले, “पीडितेच्या तक्रारीवरून यश दयालविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, चौकशीनंतर समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.” ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. यश दयालकडून अद्याप या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

