(मुंबई)
मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकांमुळे महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 च्या सामन्यांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बीएमसी निवडणुका 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून, याच दिवशी मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील WPL सामना नियोजित आहे. त्यामुळे 14 आणि 15 जानेवारी रोजी होणारे WPL सामने प्रेक्षकांविना खेळवले जाऊ शकतात, असे वृत्त समोर आले आहे.
वृत्तसंस्था आयएएनएसनुसार, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “15 जानेवारी रोजी मुंबईत बीएमसी निवडणुका आहेत. वेळापत्रकानुसार WPL सामने होणारच आहेत. मात्र, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश द्यायचा की नाही, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. सामने सुरू राहतील, परंतु मुंबई पोलिसांनी 14 आणि 15 जानेवारी रोजी सुरक्षा पुरवता येणार नसल्याचे स्पष्ट केल्याने प्रेक्षकांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.”
बीएमसी निवडणुका 15 जानेवारीला पार पडणार असून मतमोजणी 16 जानेवारी रोजी होणार आहे. 16 तारखेबाबत बीसीसीआयकडून फारशी चिंता व्यक्त करण्यात आलेली नाही. मात्र, 14 आणि 15 जानेवारी रोजी होणारे सामने प्रेक्षकांशिवायच खेळवावेत, असा आग्रह देवजीत सैकिया यांनी धरल्याचे समजते.
WPL 2026 मधील सर्व सामने 17 जानेवारीपर्यंत नवी मुंबईत आयोजित करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या एक दिवस आधी, 14 जानेवारी रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना होणार आहे. त्यानंतर 15 जानेवारी रोजी, म्हणजेच निवडणुकीच्या दिवशी, यूपी वॉरियर्स संघ पुन्हा मैदानात उतरेल आणि त्यांचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होईल.
बीएमसी निवडणुकांमुळे निर्माण झालेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या अडचणी पाहता, WPL सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा पर्याय बीसीसीआयसमोर खुला असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

