(वडोदरा)
टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मानं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. रविवारी (11 जानेवारी) न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात दोन षटकार ठोकत रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार पूर्ण केले. हा पराक्रम करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
या विक्रमासह रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. याआधी हा मान वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज ख्रिस गेलकडे होता, ज्याच्या नावावर 553 षटकार आहेत. म्हणजेच रोहित आणि ‘युनिव्हर्स बॉस’ गेल यांच्यात तब्बल 95 षटकारांचे अंतर निर्माण झाले आहे.
पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मानं 26 धावांची खेळी केली. या डावात त्यानं दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. काइल जेमिसनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो कीवी कर्णधार मायकेल ब्रेसवेलकडे झेल देत बाद झाला. मात्र, या दोन षटकारांमुळे त्यानं 650 आंतरराष्ट्रीय षटकारांचा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला.
याशिवाय रोहित शर्मा वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक षटकार मारणारा सलामीवीरही ठरला आहे. त्यानं सलामीवीर म्हणून 329 षटकार पूर्ण करत ख्रिस गेलचा 328 षटकारांचा विक्रम मोडला. एकूण वनडे क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर आता 357 षटकार आहेत. 2025 मध्ये त्यानं या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा शाहिद आफ्रिदीचा दीर्घकाळचा विक्रमही मागे टाकला होता.
रोहित शर्माचं वर्चस्व केवळ वनडेपुरतं मर्यादित नाही. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला असून, 205 षटकारांसह त्यानं या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 षटकारांचा टप्पा गाठणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्येही त्यानं 88 षटकार ठोकले आहेत.
2007 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या रोहित शर्माचा सुरुवातीचा प्रवास फारसा प्रभावी नव्हता. मात्र, तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं त्याला सलामीवीर म्हणून संधी दिल्यानंतर त्याच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले. आतापर्यंत 280 वनडे सामन्यांत रोहितनं 11,542 धावा केल्या असून, त्यात 33 शतकं आणि 61 अर्धशतकांचा समावेश आहे.
हिटमॅन रोहित शर्मा आज केवळ भारताचाच नव्हे, तर जागतिक क्रिकेटमधील खरा Sixer King म्हणून ओळखला जात आहे.

