(मुंबई)
आशिया कपमधील अफलातून कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाचा तरुण सलामीवीर अभिषेक शर्मा याला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player of the Month) पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्याच्यासोबत या शर्यतीत भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव आणि झिम्बाब्वेचा फलंदाज ब्रायन बेनेट यांचा समावेश आहे.
विक्रमी आशिया कप कामगिरी
यूएईच्या मैदानावर झालेल्या आशिया कप स्पर्धेत अभिषेक शर्माने तुफान फॉर्म दाखवत ३ अर्धशतकांसह ३१४ धावा झळकावल्या. विशेष म्हणजे, त्याने हे यश २०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने मिळवले. तो टी-२० आशिया कप इतिहासातील ३०० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. त्याच्या या विक्रमी कामगिरीमुळे त्याला आयसीसी टी-२० क्रमवारीत ऑलटाइम सर्वोच्च रेटिंग पॉइंट्स मिळाले असून, त्याने नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
या कामगिरीच्या बळावर तो या महिन्याच्या पुरस्काराचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
यादवची फिरकी आणि बेनेटची धडाकेबाज फलंदाजी
या स्पर्धेत कुलदीप यादवनेही अप्रतिम गोलंदाजी करत १७ विकेट्स घेतल्या आणि भारताला नववे आशिया कप विजेतेपद मिळवून दिले. यूएईविरुद्धच्या सामन्यात त्याने फक्त ७ धावांत ४ विकेट्स, तर फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध ३० धावांत ४ विकेट्स घेत सामन्याचे पारडे भारताकडे वळवले. दुसरीकडे, झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेट यानेही सप्टेंबर महिन्यात ५५.२२ च्या सरासरीसह आणि १६५.६६ च्या स्ट्राइक रेटने ४९७ धावा झळकावल्या. तथापि, स्ट्राइक रेट, सातत्यपूर्ण फलंदाजी आणि टी-२० रँकिंगमधील अव्वल स्थानाच्या जोरावर अभिषेक शर्मा विजेतेपदाचा सर्वात मजबूत दावेदार ठरत आहे.

