(छत्रपती संभाजीनगर)
जन्मतः बहिरेपणाची समस्या असलेल्या दोन वर्षांच्या मुलीवर शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयात यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेमुळे संबंधित मुलीला आता ऐकू येण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. डॉ. भारत देशमुख आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. विशेष म्हणजे, हा प्रयोग मराठवाड्यात पहिल्यांदाच यशस्वी ठरला आहे.
हेडगेवार रुग्णालयाचे डॉ. देशमुख यांनी सांगितले, “नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील दोन वर्षांच्या मुलीस जन्मजात बहिरेपणाचा त्रास होता. विविध ठिकाणी उपचार करूनही फरक न पडल्याने या कुटुंबाने छत्रपती संभाजीनगरातील हेडगेवार रुग्णालयात तपासणी केली. तेथे तिला कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवण्यात आला. या शस्त्रक्रियेत स्मार्ट नेव्हिगेशन तंत्रज्ञान वापरून मुलीच्या कानात इलेक्ट्रोड बसवण्यात आले. तब्बल ४ तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत, ३ मिनिटे २० सेकंद हात स्थिर ठेऊन इलेक्ट्रोड कानाच्या आत बसवण्यात आला. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची ही एक कौशल्यपूर्ण कामगिरी होती,” असेही त्यांनी सांगितले.
गर्भधारणेदरम्यान औषधांचे दुष्परिणाम टाळा – डॉक्टरांचा सल्ला
या विषयावर बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, “गर्भधारणेच्या काळात महिलांनी घेतलेल्या काही औषधांचे दुष्परिणाम पोटातील बाळावर होऊ शकतात. यामुळे ऑक्सिजनचा अभाव, काही सिंड्रोम्स इ. समस्यांमुळे बाळाला जन्मजात बहिरेपणा येऊ शकतो. त्यामुळे गर्भधारणेच्या दरम्यान औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला अत्यावश्यक आहे. गोवर, काविळ यांसारख्या आजारांपासून बचावासाठी गर्भधारणेच्या दरम्यान लसीकरण करणे गरजेचे आहे. तसेच, पोषक आहार घेणे गर्भवती महिलांसाठी अत्यंत आवश्यक आहे. चांगल्या आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बाळाचे आरोग्यही चांगले राहते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
आधुनिक जीवनशैलीमुळे बहिरेपणाचे प्रमाण वाढतेय
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत बहिरेपणाचे प्रमाण वाढताना दिसते. मोठ्या आवाजात संगीत ऐकणे, सतत यंत्रांचा वापर यामुळे कानांवर ताण येतो आणि कालांतराने ऐकण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे सावध राहणे, योग्य काळजी घेणे आणि वेळेवर तपासणी करणे गरजेचे असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.

