(पुणे)
पुणे पोलिस दलातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वरूप विष्णू जाधव (वय २८) या पोलिस शिपायाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली असून, या आत्महत्येमागील कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. सदर प्रकरणाचा तपास खडक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
स्वरूप जाधव हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील रहिवासी होते. त्यांनी २०२३ साली पुणे पोलिस दलात सेवा सुरू केली होती. सध्या ते स्वारगेट येथील पोलिस लाईनमधील अपार्टमेंटमध्ये मित्रासोबत तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक ३८४ मध्ये राहत होते. सोमवारी, ५ जुलै २०२५ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी घराच्या हॉलमधील खिडकीच्या अँगलला टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही माहिती डायल ११२ वर २ वाजून ११ मिनिटांनी मिळताच खडक पोलिस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि तपासास सुरुवात झाली.
सुसाईड नोट नाही
पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मात्र, स्वरूप जाधव यांच्या मोबाईलमध्ये आत्महत्येमागील कारणांचा उल्लेख असण्याची शक्यता लक्षात घेऊन, पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला आहे. त्यातून काही ठोस पुरावे मिळतात का, याचा तपास सुरु आहे.
एका तरुण पोलिस कर्मचाऱ्याने अशा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे पुणे पोलिस दलात चिंता आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अचानक केलेल्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही दिवसांत अशा आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलिस विभागात तणाव, मानसिक आरोग्य आणि काउन्सेलिंगच्या गरजेकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

