( संगमेश्वर )
टेलिग्राम अॅपवरील ‘वर्क फ्रॉम होम’ च्या आमिषाने संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील एका महिलेला तब्बल २.२९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सौ. निता प्रेमदास गमरे (वय ४६, रा. गोळवली बौद्धवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांना ‘वंशिका’ नावाने असलेल्या टेलिग्राम अकाउंटवरून वर्क फ्रॉम होम संदर्भात संदेश प्राप्त झाला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर आरोपी क्रमांक १ ने त्यांना ऑनलाईन कामाची पद्धत समजावून सांगितली. त्यानंतर ‘customer support’ नावाच्या टेलिग्राम ग्रुपकडून वेळोवेळी विविध टास्क पूर्ण करण्यास व पुढील टास्कसाठी आगाऊ रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. या सूचनांनुसार, फिर्यादी यांनी दिलेल्या बँक खात्यांमध्ये २,२९,१३२ रुपये ऑनलाईन पद्धतीने भरले. मात्र, या रकमेपैकी एकही पैसे फिर्यादींना परत मिळाले नाहीत. उलट, आरोपींनी आणखी पैसे भरण्याचा आग्रह धरत दबाव आणल्याचे फिर्यादींचे म्हणणे आहे. टाटा क्लिक या कंपनीच्या नावाचा वापर करून आरोपींनी ही फसवणूक केली असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नं. ९१/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक १ ते ४ हे ‘हिना’, ‘निखिल पाटील’, ‘विध्नेश’ आणि ‘सुमित’ या नावांनी ओळखले जात असून, त्यांच्या अधिक तपशीलांचा शोध सुरू आहे. याबाबत पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

