( संगमेश्वर / मकरंद सुर्वे )
चिपळूण तालुक्यातील मौजे कोसबी येथे स्वामीत्व गावठाण योजना राबवण्यात येत असून, या योजनेंतर्गत आज, ६ जून रोजी भूधारकांना सनद वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते लाभार्थी भूधारकांना मालकी हक्काच्या सनदा वितरित करण्यात आल्या. या वेळी उपअधीक्षक, भूमी अभिलेख चिपळूण श्री. संतोष भागवत, शिरस्तेदार श्री. संजय पाटोळे, मा. उपसरपंच श्री. दत्ता गुजर, तसेच कोसबी ग्रामस्थ आणि लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वामीत्व योजनेद्वारे गावठाणातील नागरिकांना त्यांचे अधिकृत मालकी हक्क मिळत असून जमिनीच्या कागदपत्रांची स्पष्टता व भविष्यातील व्यवहार सुलभ होणार आहेत. या उपक्रमामुळे ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण असून शासनाच्या या उपयुक्त योजनेचे स्वागत करण्यात येत आहे.