(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथील हॉटेल ड्राइव्ह-इनसमोर अपघातांचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अवघ्या ७२ तासांत याच ठिकाणी ८ अपघात घडूनही संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे हा परिसर अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे.
शनिवारी रात्री पुन्हा एकदा गंभीर अपघात घडला. कोणतेही इशारा फलक, रिफ्लेक्टर्स किंवा बॅरिकेड्स नसल्याने अंधारात चालकाला समोरील ढिगारा दिसला नाही. वेगात असलेले चारचाकी वाहन थेट त्या ढिगाऱ्यावर आदळून हवेत उडाले आणि जोरात खाली आपटले. वाहनात दोन लहान मुलांसह कुटुंब प्रवास करत होते. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले असून कुटुंब हादरून गेले आहे.
गुरुवारपासून सुरू झालेल्या अपघातांच्या मालिकेत महागड्या कारचा चक्काचूर, रुग्णवाहिका अडकणे आणि अनेक दुचाकी अपघातांचा समावेश आहे. तरीही ठेकेदाराने मातीचा ढिगारा हटवणे, इशारा फलक लावणे किंवा रात्री दिसतील असे सुरक्षा उपाय करण्याची कोणतीही तसदी घेतलेली नाही.
या निष्काळजीपणामुळे वाहनचालक आणि स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “रस्ता बांधण्याचा ठेका घेतला आहे की जीव धोक्यात घालण्याचा?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. सलग तीन दिवस अपघात होऊनही प्रशासन आणि ठेकेदार दोघेही निष्क्रिय असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात आणि संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहिली जात आहे का, असा संतप्त प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

