( रत्नागिरी )
तोंडी करारावर चालवायला घेतलेल्या रिसॉर्टचा ताबा करार संपण्यापूर्वीच बेकायदेशीरपणे घेतल्याने, पुण्यातील महिलेची ९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना जयगड येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी रिसॉर्टचे मालक डॉ. योगेश जोग व मनमोहन जोग यांच्याविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरती मुकुंद चाफेकर (रा. पुणे) यांनी जयगडमधील ‘ओशियन बीच’ उर्फ सीडेक सॅण्डी रिट्रीट रिसॉर्ट तोंडी करारावर चालवायला घेतले होते. यादरम्यान त्यांच्या पतींची प्रकृती खालावल्याने चाफेकर यांनी दोन महिने आधीच रिसॉर्टचा ताबा परत देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, कराराची मुदत पूर्ण होण्याआधीच डॉ. योगेश जोग आणि मनमोहन जोग यांनी रिसॉर्टचा ताबा घेतला.
त्यांनी चाफेकर यांच्याकडून घेतलेले ५ लाखांचे डिपॉझिट व हॉटेलमधील ४ लाखांचे वैयक्तिक सामान परत न करता एकूण ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर चाफेकर यांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, संशयित आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१८(४), ७५, ७९ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत.