( रत्नागिरी )
तालुक्यातील खेडशी येथील एका तरुणाने आपल्या सोबत राहणाऱ्या व्यक्तीवर विश्वासघात करत त्याचे मोबाईल, दुचाकी तसेच बँक खात्यातील ३३ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अकरम शेख (रा. पनवेल) याच्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दिपक चंपालाल चौधरी (वय ३३), रा. एकता नगर, खेडशी, रत्नागिरी (मूळ रा. बलरामपूर, जि. खंडवा, मध्यप्रदेश) हे गरुनाथ कृष्णा कळंगुटकर यांच्या घरी भाड्याने वास्तव्यास आहेत. फिर्यादी हे २ जुलै रोजी दुपारी घरात झोपलेले असताना, त्यांच्यासोबतच राहत असलेला संशयित अकरम शेख याने त्यांच्या घरातून चोरीच्या हेतूने त्यांचा टेक्नो कंपनीचा मोबाईल (किंमत सुमारे २,००० रुपये) आणि टीव्हीएस कंपनीची स्पोर्ट दुचाकी (क्रमांक MH-08-Y-2831, किंमत सुमारे ६,००० रुपये) चोरून नेली.
यापुढे, संशयित आरोपीने चोरलेल्या मोबाईलचा वापर करून फिर्यादीच्या AU बँकेतील खात्यातून ३३,००० रुपये स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे मोबाईल, दुचाकी आणि बँक फसवणुकीसह एकूण ४१,००० रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र. नं. १३१/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

