(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर : फुणगूस-जाकादेवी मुख्य मार्गावर कोंडये गावाच्या हद्दीत प्रवेश करताच आता प्रवाशांचे स्वागत भव्य आणि आकर्षक ग्रामप्रवेश कमानी करत आहेत. सोयने फाटा आणि वगडा फाटा येथे उभारण्यात आलेल्या या देखण्या कमानींमुळे कोंडये गावाच्या सीमांचे सुशोभीकरण झाले असून पंचक्रोशीत या वेशींचे विशेष कौतुक होत आहे.
गावाची कमान ही केवळ एक वास्तू नसून त्या गावाच्या संस्कृती, ओळख आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानली जाते. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवत कोंडये गावाच्या दोन्ही प्रमुख प्रवेशद्वारांवर या भव्य कमानी उभारण्यात आल्या आहेत.
फुणगूस-जाकादेवी मुख्य रस्त्यावरून कोंडये गावात जाण्यासाठी सोयने फाटा आणि वगडा फाटा असे दोन स्वतंत्र मार्ग आहेत. या दोन्ही रस्त्यांच्या सुरुवातीलाच आकर्षक प्रवेश कमानी उभारण्यात आल्या असून त्यांचे मजबूत आणि दर्जेदार बांधकाम प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे. या दोन्ही मार्गांमधून विस्तीर्ण कोंडये गावात प्रवेश करता येत असल्याने गावाच्या वैभवाची प्रचिती प्रवेशद्वारावरच येते.
दोन्ही मार्ग खाडी समांतर रस्त्याला जोडलेले
विशेष म्हणजे, मुख्य रस्त्यावरून वेगवेगळ्या दिशेने गावात प्रवेश करणारे हे दोन्ही मार्ग पुढे जाऊन खाडी समांतर रस्त्याला मिळतात. त्यानंतर हा रस्ता एकत्रितपणे कोंडये-डावखोल सीमेपर्यंत जातो. त्यामुळे हे दोन्ही मार्ग प्रवाशांसाठी सोयीस्कर आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहेत.
महिला नेतृत्वातून साकारले विकासाचे प्रतीक
कोंडये गावाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या भव्य प्रवेश कमानींचे बांधकाम गावाच्या पहिल्या महिला सरपंच पूनम देसाई यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले. गावाला स्वतंत्र ओळख मिळावी आणि प्रवेशद्वार भव्य स्वरूपात उभे राहावे, यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे ग्रामस्थ सांगतात.
ग्रामीण विकासासोबतच गावाच्या सौंदर्यीकरणावर भर देत पूनम देसाई यांनी महिला नेतृत्वाची प्रभावी छाप उमटवली आहे. त्यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या या कमानी आज कोंडये गावाच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरत आहेत.
प्रवाशांसाठी दिशादर्शक ठरतायत कमानी
फुणगूस-जाकादेवी हा परिसराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावरून दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. पूर्वी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना गावाची सीमा ओळखणे अवघड जात होते. मात्र, आता सोयने आणि वगडा फाटा येथील या कमानींमुळे गावाची ओळख स्पष्ट झाली असून प्रवाशांची अडचण दूर झाली आहे.
आकर्षक रंगसंगतीने वेधले सर्वांचे लक्ष
दर्जेदार बांधकाम, आकर्षक रंगसंगती आणि मोठ्या अक्षरात कोरलेले ‘कोंडये’ गावाचे नाव यामुळे या कमानी दूरवरूनच लक्ष वेधून घेत आहेत. गावाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या वेशी आता परिसरातील चर्चेचा आणि अभिमानाचा विषय बनल्या आहेत.
फुणगूस-जाकादेवी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी सोयने आणि वगडा फाट्यावरील या भव्य प्रवेश कमानी आता आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

