(संगमेश्वर)
संगमेश्वर येथील विद्यार्थ्यांनी मास्टर एज्युकेशन अकॅडमी, इचलकरंजी येथे झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. विविध वयोगटांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी गणितीय कौशल्य, वेग आणि अचूकतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
ही स्पर्धा केवळ १० मिनिटांची असून या कालावधीत तब्बल २०० गणितीय उदाहरणे सोडवावी लागतात. मर्यादित वेळेत अचूक उत्तर देण्याचे आव्हान विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या पेलत आपली बौद्धिक क्षमता सिद्ध केली.
या स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी संगमेश्वर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, कसबा, दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी तसेच जिल्हा परिषद शाळा असुर्डे व माभळे-जाधववाडी येथील आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण विरा इन्स्टिट्यूट, संगमेश्वर येथे रविवारी विशेष प्रशिक्षण दिले जाते.
स्पर्धेत कु. युगा फटकरे, कु. आराध्य पांचाळ, अर्णव जाधव, विवान भांगे, वीर घोळवे, ओम झगडे, सिद्धांई मोरे, अंशिका देशपांडे, गौरांगी घडशी, आराध्या आंबवकर, रुही आंबवकर, वेद बरगळे, निधी सावंत, शुभ्रा सुर्वे आणि ऋत्विक माळी या विद्यार्थ्यांनी चॅम्पियन, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत यश मिळवले.
या यशाबद्दल पालक, शिक्षक आणि संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि शिक्षण विरा इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. धनाजी भांगे तसेच पुष्पा अबॅकस अकॅडेमीच्या संचालिका सविता भन्साळी मॅडम यांचे योग्य मार्गदर्शन हे या यशामागील प्रमुख कारण ठरले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे संगमेश्वरच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक राज्यपातळीवर वाढला आहे.

