(पंढरपूर)
“लोचनात त्रिभुवन अवघे, लेकरांस गवसुन जाय माझी पंढरीची माय…” अशा भक्तिरसात न्हालेल्या उंच दिंड्यांच्या सोबतीने वारकऱ्यांचा महासागर आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विसावत आहे. याच पावन वातावरणात ६ जुलै रोजी (आषाढी एकादशी) पंढरपूर येथे भव्य वारकरी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनातून धर्मरक्षण, राष्ट्रनिष्ठा आणि वारकरी एकजूट यांवर भर देण्यात येणार आहे.
अधिवेशनाचे आयोजन आणि प्रमुख वक्ते
हे अधिवेशन दुपारी १ ते ३.३० या वेळेत, सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठ, भक्तीमार्ग, जनकल्याण हॉस्पिटलजवळ, पंढरपूर येथे होणार आहे. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी महंत प.पू. रामगिरी महाराज असतील.
या वेळी मार्गदर्शनासाठी सहभागी होणारे प्रमुख वक्ते: ह.भ.प. बंडातात्या कराडकर (ज्येष्ठ कीर्तनकार, संतवीर), ह.भ.प. रामेश्वरशास्त्री महाराज (अध्यक्ष, महाराष्ट्र वारकरी महामंडळ), ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी (सचिव, महामंडळ), ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ (विश्वस्त, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर), श्री. शेखर मुंदडा (अध्यक्ष, महाराष्ट्र गोसेवा आयोग), ह.भ.प. माणिक महाराज मोरे (जगद्गुरु श्री संत तुकाराम संस्थान), योगी निरंजननाथ (विश्वस्त, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी), स्वामी भारतानंद सरस्वती (अ.भा. संत समिती, प्रदेश महामंत्री) सुनील घनवट (राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती) या अधिवेशनात अनेक संत-महंत, ह.भ.प., धर्माचार्य आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात चर्चेला येणारे महत्त्वाचे विषय
या अधिवेशनात वारकरी संप्रदायाच्या श्रद्धास्थानांवरील असलेल्या प्रश्नांवर गंभीर चर्चा होणार असून, पुढील मागण्या शासनाकडे ठोसपणे मांडल्या जाणार आहेत:
-
पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण, मुक्ताईनगर यांसारख्या तीर्थक्षेत्रांपासून मद्य व मांस विक्री कायमस्वरूपी बंद करावी.
-
तीर्थक्षेत्रांच्या १० किलोमीटर परिसरात अहिंदू धर्मप्रसारावर बंदी घालावी.
-
संत, संतवाङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म व देवतांचा अवमान करणाऱ्यांविरोधात ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा.
-
संतांचे अभंग, श्लोक यांचा चुकीचा अर्थ लावून वातावरण कलुषित करणाऱ्यांना शासनाने कारवाईतून प्रतिबंधित करावे.
-
गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी विद्यमान कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी.
-
‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा राज्यात तात्काळ लागू करावा.
-
इंद्रायणी आणि चंद्रभागा नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात.
या अधिवेशनात धर्मरक्षणासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. आयोजकांच्या वतीने भाविक, वारकरी आणि हिंदुत्वप्रेमी संघटनांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राजन बुणगे – ९७६२७२१३०४ यांचेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळख आहे. पंढरपूर अधिवेशनाच्या माध्यमातून या संप्रदायाचे राष्ट्रहित, धर्मरक्षण आणि सामाजिक भान अधोरेखित होत असून, शासनासमोर वारकऱ्यांच्या मागण्या ठामपणे मांडल्या जाणार आहेत.

