(नवी दिल्ली)
कोविड-१९ लसीकरणानंतर तरुणांमध्ये वाढलेले हृदयविकाराचे झटके आणि अचानक मृत्यू या संदर्भात समाजात पसरलेल्या संभ्रमावर अखेर शास्त्रीय स्पष्टता आली आहे. AIIMS (अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था) आणि ICMR (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) यांच्या संयुक्त अभ्यासात कोविड लसीकरणाचा हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंशी कोणताही थेट संबंध आढळून आला नसल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या अभ्यासाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले. त्यानुसार, “लसीकरणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो” हा दावा पूर्णतः निराधार, खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
देशभरातील ४७ रुग्णालयांमध्ये सखोल अभ्यास
हा अभ्यास मे ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत देशातील १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ४७ रुग्णालयांमध्ये करण्यात आला. या अभ्यासासाठी अशा पूर्वी पूर्णतः निरोगी व्यक्तींची निवड करण्यात आली होती, ज्या ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान अचानक मृत्युमुखी पडल्या होत्या. अभ्यासात हे निष्पन्न झाले की, या मृत्यूंच्या घटनांमागे अनुवंशिक कारणे, जीवनशैलीतील दोष, आधीपासून अस्तित्वात असलेल्या आरोग्य समस्या, तसेच कोविड संसर्गानंतर निर्माण झालेल्या गुंतागुंती हे प्रमुख घटक होते. त्यामुळे या मृत्यूंना थेट लसीकरणाशी जोडणे हे अवैज्ञानिक आणि तथ्यहीन आहे, असे अभ्यासकांचे स्पष्ट मत आहे.
भ्रामक माहितीपासून सावधगिरीची गरज
आरोग्य मंत्रालयाने यानंतर नागरिकांना आवाहन केले आहे की, कोविड लसीकरणासंदर्भात पसरवण्यात येणाऱ्या अफवा आणि अपप्रचारापासून सावध राहावे. चुकीची माहिती केवळ भीती पसरवतेच असे नाही, तर ती लसीकरण न करण्याच्या निर्णयांवरही परिणाम करू शकते. याचा थेट परिणाम देशाच्या सार्वजनिक आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. अलीकडेच अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तसेच अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री सुष्मिता सेन यांनाही हृदयविकाराचा झटका आला होता. या घटनांनंतर लसीकरणामुळे हृदयविकार वाढतो, अशी चर्चा समाजमाध्यमांमध्ये रंगू लागली होती. मात्र, AIIMS-ICMR च्या अभ्यासाने हे दावे पूर्णतः खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोविड लस आणि अचानक होणारे हृदयविकार यांच्यात थेट कोणताही संबंध नसल्याचे AIIMS व ICMR च्या अभ्यासातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी शास्त्रीय पुराव्यांवर आधारित माहितीवर विश्वास ठेवावा आणि अफवांपासून सावध राहावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

