(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे सुपुत्र तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते शिरीष शंकर लिंगायत यांची रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन (RTO) संस्थेच्या रत्नागिरी तालुका संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र संस्थेमार्फत त्यांना प्रदान करण्यात आले.
या निवडीबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मालगुंड शाखेतर्फे शिरीष लिंगायत यांचा नुकताच सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव, माजी तालुकाप्रमुख राजेंद्र शिंदे, युवासेना तालुका समन्वयक साईनाथ जाधव, युवासेना उपतालुकाप्रमुख रोहित साळवी, शाखाप्रमुख बावा आग्रे, उपशाखाप्रमुख हरीनाथ शिवगण, पंकज खेऊर, तसेच वसंत फडकले, जगन सुर्वे, राजू गुरव, महेश फडकले, सागर मांडवकर आदी उपस्थित होते. उपस्थितांनी शिरीष लिंगायत यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शिरीष लिंगायत हे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून त्यांनी यापूर्वी मालगुंड येथील जीवन शिक्षण प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच ते कवी केशवसुत स्मारक समितीअंतर्गत कार्यरत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालगुंड शाखेचे सदस्य असून मालगुंड तंटामुक्त समितीचेही सदस्य आहेत. गावातील विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो.
त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनने त्यांची रत्नागिरी तालुका संघटकपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडीचे मालगुंडसह संपूर्ण परिसरातून स्वागत होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

