(पोलादपूर / शैलेश पालकर)
पोलादपूर शहरातील पश्चिमेकडील सर्व्हिस रोडवर स्कूटर घसरल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी पनवेलकडे हलवण्यात येत असताना नागोठणे दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
महालगुर (ता. पोलादपूर) येथील जय धोंडू कदम हा कामानिमित्त एक्टिव्हा स्कूटरवरून पश्चिमेकडील सर्व्हिस रोडने जात होता. यावेळी स्कूटर घसरल्याने तो रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवालदार संदीप कदम तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील कदम यांना तात्काळ पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सलागरे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
मात्र, रुग्णवाहिकेद्वारे पनवेलकडे नेत असताना नागोठणे परिसरातच जय कदम यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह पुन्हा पोलादपूर येथे आणण्यात आला.
दरम्यान, पोलादपूर शहरातील महामार्गालगतच्या पूर्व व पश्चिम सर्व्हिस रोडवर सध्या वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. स्कायओव्हर ब्रिजचे काम सुरू असल्याने वाहतूक एकेरी पद्धतीने वळवण्यात येत असून दोन वाहने एकाच मार्गावर समोरासमोर आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. समन्वयाअभावी वाहनचालकांची मोठी गैरसोय होत असून याच कारणामुळे हा अपघात घडल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्व्हिस रोडवरील वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

