(नागपूर)
नागपूरच्या बुद्धिबळ सुकन्या दिव्या देशमुख हिने जागतिक बुद्धिबळ विश्वात भारताचे नाव एका नव्या शिखरावर पोहोचवले आहे. लंडन येथे सुरू असलेल्या ‘वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिप २०२५’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत, दिव्याने चक्क ‘वर्ल्ड नंबर वन’ ग्रँडमास्टर होऊ यिफान हिला पराभूत करत बुद्धिबळ जगतात खळबळ उडवून दिली आहे.
केवळ १९ वर्षांची दिव्या देशमुख ही गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सातत्याने चमकत असून, तिच्या डावपेचात दिसणारी परिपक्वता आणि धाडसी निर्णय क्षमतेने ती बुद्धिबळ विश्वात एक वेगळं स्थान निर्माण करत आहे. यंदाच्या स्पर्धेत तिने दाखवलेली चपळता आणि अचूक गणित यामुळेच तिने यिफानसारख्या अनुभवी खेळाडूला पराभूत करण्याची पराक्रमी कामगिरी केली.
दिव्याने मिळवलेला हा विजय केवळ तिच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. तिच्या या यशामुळे नवोदित बुद्धिबळपटूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, “भारतीय बुद्धिबळाचे भविष्य आता अधिक भक्कम आणि तेजस्वी दिसत आहे”, अशा प्रतिक्रिया तज्ज्ञांकडून उमटत आहेत.
सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
दिव्याच्या या चमकदार विजयामुळे सोशल मीडियापासून ते क्रीडाविश्वापर्यंत सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळालेलं हे यश नव्या पिढीतील खेळाडूंना ‘न थांबता, न झुकता’ लढण्याची प्रेरणा देणारे ठरले आहे.