(मुंबई)
मुंबई सत्र न्यायालयानं गुरुवारी एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या ४० वर्षीय महिला शिक्षिकेची पोलिस कोठडी नाकारली आणि तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास अधिकाऱ्यांनी आणखी कोठडी मागितली होती, परंतु पोलिस कोठडी वाढवण्यासाठी तिच्या वकिलांकडून कोणतेही ठोस कारण देण्यात आले नाही.
गुरूवारी या महिलेची एका मानसोपचारतज्ञांकडे अपाँइंटमेंट आधीपासूनच घेतलेली आहे, अशी माहिती तिच्या वकिलांनी एका अर्जाद्वारे न्यायालयात सादर केली. याची नोंद घेत मुंबई सत्र न्यायालयानं आरोपी शिक्षिकेला बुधवारी एका दिवसाची पोलीस कोठडी अगोदरच वाढवून दिली होती. पोलीस कोठडी संपल्यानं रिमांडकरता या शिक्षिकेला गुरूवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आलं होतं. शिक्षिकेकडून अधिक चौकशीची गरज नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट करताच न्यायालयानं तिची रवानगी कारागृहात केली आहे.
या शिक्षिकेवर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गंत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून शिक्षिका पीडित विद्यार्थ्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत होती. ही शिक्षिका विवाहित असून तिला एक मुलगाही आहे. पीडित मुलगा 10 वीत शिक्षण घेत असून तो 16 वर्षांचा आहे तर आरोपी शिक्षिका 40 वर्षांची आहे.
डिसेंबर 2023 मध्ये शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात हा विद्यार्थी शिक्षिकेच्या संपर्कात आला होता. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये शिक्षिकेनं या विद्यार्थ्यावर आपल्या गाडीतच पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर ही शिक्षिका विद्यार्थ्याला दक्षिण मुंबई आणि विमानतळ परिसरातील मोठमोठ्या हॉटेलात घेऊन जात तिथं त्याच्यावर अत्याचार करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक शोषणाचा हा प्रकार एक वर्षांहून अधिक काळ सुरू होता. विद्यार्थ्याच्या वर्तनात बदल झाल्याचं त्याच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्याने कथितरित्या स्वतःच लैंगिक शोषण होत असल्याचं सांगितलं. मात्र, विद्यार्थ्याची बोर्डाची परीक्षा होती. काही महिन्यांतच शालेय शिक्षण पूर्ण होणार असल्यानं त्याचे पालक शांत राहिले. मात्र, आरोपी शिक्षिका मुलाचा पिच्छा सोडण्याचं काही नाव घेत नसल्यानं पालकांनी पोलिस स्टेशन गाठून सगळा प्रकार सांगितला.
विद्यार्थ्यानं या शिक्षिकेपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही ही शिक्षिका इतर विद्यार्थी आणि एका अन्य शिक्षिकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्याशी संपर्कात होती. या सर्व प्रकारामुळं पीडित विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावात होता. शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी शिक्षिका अनेकदा विद्यार्थ्याला जबरदस्तीनं मद्य पाजत होती, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. ही शिक्षिकाही विद्यार्थ्यासोबत मद्यपान करायची आणि त्याला तणाव कमी करण्याच्या गोळ्याही द्यायची, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केली. लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर पुढील काही दिवसांत विद्यार्थ्याला अस्वस्थ वाटू लागलं. हे लक्षात आल्यानंतर आरोपी शिक्षिकेनं विद्यार्थ्याला ‘अँटी-अँग्झायटी पिल्स’ (शांत राहण्यासाठी गोळ्या) देखील दिल्याचं समोर आलं आहे.
या सर्व प्रकारामुळे पीडित विद्यार्थी अबोल झाला होता. मित्र, कुटुंबिय यांच्याच्याशी तो हळूहळू दुरावू लागला. हे लक्षात आल्यावर कुटुंबीयांनी त्याच्याशी संवाद साधला तेव्हा विद्यार्थ्यांनं आपल्या आईवडिलांकडे या संबंधांची कबूली दिली. मुलाचं दहावीचं वर्ष असल्यानं कुटुंबीयांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. शाळा संपल्यानंतरही शिक्षिका आपल्या मुलाचा पिच्छा सोडेल अशी त्यांना आशा होती. मात्र, मुलगा शाळेतून उत्तीर्ण झाला. त्यानंतरही शिक्षिकेनं त्याचा पाठलाग करत त्याला त्रास देणं सुरुच ठेवलं. त्यामुळे अखेर नाईलाजानं पालकांनी दादर पोलीस ठाण्यात याची रितसर तक्रार दिली. पोलिसांनी या शिक्षिकेविरोधात पोक्सो कायद्यातील कलम 4, 6 आणि 17 सह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.