(रत्नागिरी / वार्ताहर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोके-आंबेकरवाडी फाटा येथे वारंवार होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर समस्त भोके-आंबेकरवाडी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर करून तातडीने सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
११ जुलै २०२६ रोजी याच फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात सेवानिवृत्त शिक्षक गुरुनाथ कनगुटकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
निवेदनात महामार्गाच्या दोन्ही बाजूंना रंबल स्ट्रिप्स (वेग नियंत्रक पट्टे), अपघातप्रवण क्षेत्र दर्शविणारे इशारा फलक, रिफ्लेक्टर्स, कॅट आय, सोलर ब्लिंकर लाईट्स, स्पष्ट रोड मार्किंग तसेच वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरूपी सुरक्षितता उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना युवती सेना तालुकाप्रमुख युक्ता योगेश आंबेकर, संदीप आंबेकर, शांताराम गोपाळ आंबेकर, माजी उपसरपंच संजय लक्ष्मण गावडे, राजेंद्र आंबेकर, सचिन चव्हाण, शंकर आंबेकर, अनुष्का संदीप आंबेकर, पार्वती रामा माळप, अनंत गुणाजी आंबेकर यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कार्यकारी अभियंता जाधव तसेच कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर ग्रामस्थांनी सुचविलेल्या सर्व सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी शक्य तितक्या लवकर करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
या आश्वासनानंतर भोके-आंबेकरवाडी फाटा येथे लवकरच आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविल्या जातील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

