( मुंबई )
दक्षिण मुंबईतील भायखळा येथे मोहरम मिरवणुकीदरम्यान पेनकिलर आणि आयुर्वेदिक औषध असल्याचे सांगत विषारी कॅप्सूल वाटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या फैय्याज निसार प्रेमजी (39) याच्या चौकशीत दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. माझगाव न्यायालयाने सोमवारी आरोपीची पोलीस कोठडी आणखी पाच दिवसांनी वाढवली असून, तपासाचा विस्तार आता दोन राज्यांसह परदेशी संपर्कांपर्यंत पोहोचला आहे. “किमान १५ हजार लोकांना ठार मारण्याचा माझा हेतू होता,” अशी कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणामुळे मुंबईत खळबळ उडाली असून, या कटामागे दहशतवादी किंवा आंतरराष्ट्रीय संबंध आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
आरोपीच्या मोबाईलमधून महत्त्वाचे पुरावे
मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तब्बल 30 हजार रिकाम्या कॅप्सूलची ऑनलाइन ऑर्डर दिली होती. त्यापैकी 14,900 झिंक फॉस्फाईडयुक्त कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, उर्वरित सुमारे 15 हजार कॅप्सूल अद्याप सापडलेल्या नाहीत, त्यामुळे तपास यंत्रणांची चिंता वाढली आहे.
तपासात झिंक फॉस्फाईडसह आवश्यक साहित्य दोन वेगवेगळ्या राज्यांतून ऑनलाइन मागवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्या पुरवठादारांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची विशेष पथके संबंधित राज्यांत रवाना झाली आहेत. नियमांचे उल्लंघन करून विषारी साहित्य विकणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले.
इराण-इराक कनेक्शनचा तपास
चौकशीदरम्यान आरोपीच्या मोबाईल आणि प्रवासाशी संबंधित माहितीमधून इराण आणि इराकशी संपर्काचे धागेदोरे समोर आल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या पार्श्वभूमीवर हा प्रकार एखाद्या ‘लोन वुल्फ’ हल्ल्याचा प्रयत्न होता का किंवा त्यामागे दहशतवादी हेतू होता का, याचाही तपास सुरू आहे.
‘मधुमेहावर गुणकारी’ असल्याची बतावणी
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. डोंगरी येथील हबीब रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने सांगितले की, आरोपीने त्याला या कॅप्सूल मधुमेहावरही फायदेशीर असल्याचे सांगून दिल्या होत्या. डायबिटीजची औषधे संपल्यामुळे त्यांनी त्या दोन कॅप्सूल घेतल्या. त्यानंतर उलट्या, जुलाब, अंगदुखी आणि अस्वस्थता सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
कॅप्सूलसोबत बनावट दाव्यांची चिट्ठी
पोलिसांच्या तपासात असेही उघड झाले आहे की, प्रत्येक कॅप्सूलच्या पिशवीत एक छापील चिट्ठी ठेवण्यात आली होती. त्यामध्ये या कॅप्सूल कॅन्सर, अल्झायमर, मधुमेह, थायरॉईड, दमा आणि किडनीच्या आजारांवर प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्या चिट्ठीवर एका नामांकित औषध कंपनीचे नावही छापण्यात आले होते. संबंधित कंपनीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.
मोहरम मिरवणुकीत उघडकीस आला कट
शुक्रवारी भायखळा-रे रोड परिसरातील मोहरम मिरवणुकीत आरोपी लोकांना मोफत कॅप्सूल वाटत होता. त्या पेनकिलर आणि इम्युनिटी वाढवणारे सप्लिमेंट असल्याचा दावा तो करत होता. काही जणांनी कॅप्सूल घेतल्यानंतर त्यांना उलट्या, पोटदुखी आणि अशक्तपणाचा त्रास सुरू झाला. महिला स्वयंसेवकांना संशय आल्याने त्यांनी कॅप्सूल तपासली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि मिरवणुकीत लाऊडस्पीकरवरून नागरिकांना त्या कॅप्सूलचे सेवन न करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली.
पूर्वनियोजित कटाचा संशय
प्राथमिक तपासात आरोपीने मोठ्या प्रमाणात रिकाम्या कॅप्सूल आणि झिंक फॉस्फाईड मागवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 109, 110 आणि 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

