( दापोली )
तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या आर्थिक फायद्यासाठी एका मातेने आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्याची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी संबंधित महिलेबरोबरच बालक विकत घेणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून, या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुहागर एस.टी. स्टँडसमोर ही घटना घडली. आरोपी महिलेने आपल्या पाच वर्षांच्या मुलाला आर्थिक मोबदल्यात सत्यवान दत्ताराम पालशेतकर (वय ५२, रा. बोऱ्या कारुळ, ता. गुहागर) याला विकले. सत्यवान पालशेतकर याने हे बालक खरेदी केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत दापोली पोलीस ठाण्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत कलम ८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरेमठ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

