( दापोली )
शिवजयंतीच्या सुट्टीच्या दिवशी पतीला मदत करण्यासाठी बागेत काम करताना एका ३८ वर्षीय महिला शिक्षिकेचा पाय घसरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. पूर्वा प्रशांत शिंदे (रा. कोकाबा आळी, दापोली) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे दापोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वा शिंदे यांचे वडील वणंद गुजरवाडी (ता. दापोली) येथील रहिवासी असून, त्यांची तेथे सुपारीची बाग आहे. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीची सुट्टी असल्याने पूर्वा शिंदे व त्यांचे पती प्रशांत शिंदे हे बागेत कामासाठी गेले होते. सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास काम करत असताना पूर्वा यांचा अचानक पाय घसरला आणि त्या जोरात छातीवर पडल्या.
घटनेवेळी त्यांचे चुलत भाऊ कैलास जगन्नाथ गुजर हे जवळच शेतात काम करत होते. मदतीसाठी हाक मारताच त्यांनी धाव घेतली. पूर्वा यांना तातडीने दापोलीतील केळस्कर नाका येथील डॉ. सरगुरो यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी त्यांना लगेच दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र सकाळी १० वाजता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती कैलास जगन्नाथ गुजर यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी १९ फेब्रुवारी रोजी रात्री आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
सुट्टीच्या दिवशी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गेलेल्या तरुण शिक्षिकेचा असा अपघाती मृत्यू झाल्याने वणंद गुजरवाडी आणि कोकाबा आळी परिसरात शोककळा पसरली आहे.

