(दापोली)
तालुक्यातील साकुर्डे गावात सकपाळ कुटुंबातील जुना वाद उफाळून येत दोघा सख्ख्या भावांमध्ये भीषण वाद उफाळला असून, एका रात्रीत परस्परविरोधी दोन हल्ल्यांचे गुन्हे दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, एकूण पाच जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना: घरात घुसून मारहाण; “सर्वांना ठार मारा” अशी धमकी
ही घटना २८ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. अश्विनी अशोक सकपाळ (वय ३५, रा. जालगाव पांगारवाडी, मूळ रा. साकुर्डे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या आपल्या पती अशोक सकपाळ आणि दोन मुलींसोबत साकुर्डे येथील त्यांच्या मूळ घरी जेवत असताना मारुती शांताराम सकपाळ, अमित मारुती सकपाळ, मोहन सकपाळ (सर्व रा. साकुर्डे) व राजू सातारकर (रा. दापोली) हे चौघे घरात घुसले.
त्यांनी अश्लील शिवीगाळ करत अशोक सकपाळ यांना मारहाण केली. मारुती सकपाळ याने कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने अशोक यांच्या डाव्या डोक्याला जबर मार केला. त्यानंतर अश्विनी यांनाही मारहाण करण्यात आली. अमित सकपाळ याने, “सर्वांना जिवे ठार मारा” अशी उघड धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर पोलीसांनी वरील चौघांविरोधात संबंधित कायदेशीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना: दुकानातून घरापर्यंत वादाचा धुमाकूळ
दुसऱ्या तक्रारीनुसार, मारुती शांताराम सकपाळ (वय ४३, रा. कुंभारखाणवाडी, साकुर्डे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे की, ते त्यांच्या दुकानात असताना भाऊ अशोक शांताराम सकपाळ तिथे येऊन शिवीगाळ करू लागले. त्यावर जाब विचारण्यासाठी मारुती त्यांच्या घराकडे गेले असता, अशोकने घरातील पडवीत ठेवलेली कुऱ्हाड उचलून मारहाण केली. पहिला वार खांद्यावर झाला. दोघांमध्ये झटापट सुरू असताना अमोल आणि राम शिरगावकर यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशोकने दुसरी कुऱ्हाड घेऊन मारुती यांच्या उजव्या दंडावर दुसरा वार केला. या प्रकरणी पोलिसांनी IPC 2023 चे कलम 118(1) आणि 352 अंतर्गत अशोक सकपाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
परिसरात तणाव, पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष
या परस्परविरोधी गुन्ह्यांमुळे साकुर्डे गावात तणावाचे वातावरण पसरले असून, पोलीस अधिकाऱ्यांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दोन्ही घटनांमधील तपास सुरू असून, पोलिसांकडून आणखी काही व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.