( दापोली / वार्ताहर )
दापोली तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड २९ ऑक्टोबर रोजी नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, दापोली येथे झालेल्या सभेत करण्यात आली. जिल्हाध्यक्ष आयुब मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्य महामंडळाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. नूतन पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी संतोष हजारे, उपाध्यक्षपदी प्रकाश सोनवलकर आणि अरुण सिदनाईक, सचिवपदी निलेश हिले, तर सहसचिवपदी फैयाज वलेले यांची निवड करण्यात आली. प्रसिद्धी प्रमुख म्हणून सत्यवान दळवी, विद्या समिती सचिव म्हणून भक्ती सावंत, सहसचिव म्हणून शिल्पा काटकर, जी.आर. संकलनासाठी अश्रफ आंजर्लेकर, तर महिला प्रतिनिधी म्हणून नुजहत रखांगे आणि काजल राऊत यांची बहुमताने निवड झाली.
सभेच्या प्रारंभी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून त्याला मंजुरी देण्यात आली. संघटनेची वर्गणी जमा करण्याबाबत सूचना करण्यात आली. सन २०२५-२६ या वर्षातील जमा-खर्चाचा हिशेब सभेसमोर मांडून त्यास मान्यता देण्यात आली. तसेच राज्य आणि जिल्हास्तरीय मुख्याध्यापक संघाच्या सभांमध्ये झालेल्या चर्चेतील विषयांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. त्यानंतर सर्वानुमते आणि आनंदी वातावरणात नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या सभेला मुख्याध्यापक राज्य महामंडळाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आयुब मुल्ला, तालुका अध्यक्ष संतोष हजारे, उपाध्यक्ष मधुकर मोरे, सचिव सुनील देसाई, सहसचिव फैयाज वलेले यांच्यासह इतर प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने मुख्याध्यापक उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष आयुब मुल्ला यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या या निवड प्रक्रियेला संदेश राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. उपस्थित मान्यवरांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


