(दापोली /रत्नागिरी)
खेकडे पकडून घरी परतत असताना दुचाकीतील पेट्रोल संपल्याने पायी प्रवास करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दापोलीत समोर आली आहे. मदन काशिनाथ वाळंज (वय ४५, रा. करंजानी, कातळवाडी, ता. दापोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद दापोली पोलिसांकडे करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास रूपेश रमेश आंग्रे आणि मदन वाळंज हे बोंडिवली येथून खेकडे पकडून परतत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या वाहनातील पेट्रोल संपल्याने दोघेही पायी येत होते. याच वेळी मदन वाळंज हे मागील बाजूस जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर २० ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजता त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे आकस्मिक मृत्यू क्रमांक ७८/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.


