(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावर मुठवली गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तिचा भाऊ गंभीर जखमी आहे. ही घटना सोमवार, १ सप्टेंबर रोजी दुपारी हॉटेल नम्रता गार्डनजवळ घडली.
भरधाव एसटीची स्कूटीला धडक
खेड-महाड-पनवेल मार्गे मुंबईकडे जाणारी एसटी महामंडळाची बस (क्र. एमएच २० बी १९६०) प्रवाशांनी भरलेली भरधाव वेगाने जात असताना, चालकाने पुढे जात असलेल्या स्कूटीला (क्र. एमएच ०६ सीएच ४६६४) पाठीमागून जोरदार धडक बसली.
या धडकेत स्कूटीवर प्रवास करणारी देवयानी किशोर गोळे (१९, रा. पनवेल सीकेटी) हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा भाऊ सुजल किशोर गोळे (१६) गंभीर जखमी झाला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, देवयानी किशोर गोळे (वय १९, रा. ऐनवहाळ, ता. रोहा, जि. रायगड) ही १ सप्टेंबर रोजी गौरी सणासाठी मामाकडे जात होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास तिने आपल्या भावाला, सुजल किशोर गोळे (वय १५) याला सोबत घेतले आणि स्कूटीवरून रोहा तालुक्यातील देवकान्हे येथे प्रवास करत होती.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पुगाव गावच्या हद्दीत असलेल्या नम्रता धाब्यासमोर आल्यानंतर, अचानक मागून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील खेड आगाराच्या एसटी बसने (चालक जितेंद्र अवसरमल) त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात देवयानीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाला.
दरम्यान, या अपघातानंतर बसचालक जितेंद्र अवसरमल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. देवयानी पनवेल सीकेटी येथील कॉलेजमध्ये बीएमएसचे शिक्षण घेत होती. गौरी सणासाठी मामाकडे येत असताना हा अपघात झाला.
तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एम. आर. गायकवाड करीत आहेत.

