(गणपतीपुळे / वैभव पवार)
भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजलपातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने सत्कोंडी ग्रामपंचायतीने जलसंधारणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामस्थ, महिला बचतगट, ग्रामसंघ, युवक मंडळे, शाळा आणि अंगणवाड्यांच्या सामूहिक सहभागातून श्रमदानाद्वारे चार कच्चे व गॅबियन बंधारे उभारण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमांतर्गत महसूल गाव कांबळे लावगण येथील ब्रह्म्याच्या पऱ्यावर बंधारा बांधण्यात आला. या कामात बलेकरवाडी नवरात्रोत्सव मंडळाने सक्रिय सहभाग घेतला. महसूल गाव पन्हळी येथे ग्रामस्थ आणि महिला बचतगटांनी एकत्र येत श्रमदानातून बंधारा उभारणीस हातभार लावला. तसेच महसूल गाव सत्कोंडी येथे वळकुंडी नदीवर बंधारा बांधून पाणी अडविण्याची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय नदीपात्रातील गाळ उपसा करून ते मोकळे करण्याचे नियोजनही ग्रामपंचायतीने केले आहे.
जलसंधारणाच्या या कामात ग्रामस्थांसोबत महिला मंडळे आणि तिरंगा ग्रामसंघानेही सहभाग नोंदविला. जिल्हा परिषद सत्कोंडी, पन्हळी आणि कांबळे लावगण येथील शाळा तसेच तिन्ही अंगणवाड्यांनीही या उपक्रमात योगदान दिले. महिला बचतगट आणि ग्रामसंघांनी पुढाकार घेतल्यामुळे या उपक्रमाला व्यापक लोकसहभागाचे स्वरूप प्राप्त झाले.
या उपक्रमासाठी सरपंच सतीश थुळ, उपसरपंच चंद्रकांत मालप, ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत कुळ्ये, ग्रामपंचायत सदस्य अजय काताळे, समीक्षा घाटे, प्रणाली मालप, सर्व शाळा व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक नागरगोजे, महेश रहाणे, सुशील वासावे, आशा सेविका सुजाता खापले, अंगणवाडी सेविका कमल मालप, रुपाली घोसाळे, चित्रा बैकर, सीआरपी संगीता मोर्ये, कर्मचारी विश्वनाथ बैकर, किरण बलेकर आणि रोहिदास मालप यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत सत्कोंडी ग्रामपंचायतीने सामूहिक श्रमदानातून जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला आहे. गावाच्या पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेतल्याने हा उपक्रम केवळ ग्रामपंचायतीपुरता मर्यादित न राहता लोकसहभागातून राबविण्यात आलेली चळवळ ठरला आहे. उभारण्यात आलेले बंधारे भविष्यातील जलसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, गावाच्या शाश्वत जलसमृद्धीसाठी हा सामूहिक प्रयत्न आशादायी मानला जात आहे.


