(खेड / रत्नागिरी)
विक्रीच्या उद्देशाने गांजा हा अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपावरून खेड पोलिसांनी २९ वर्षीय तरुणावर कारवाई केली. फुरुस येथे खेड-दापोली मार्गालगत शुक्रवारी सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी ३२० ग्रॅम वजनाचा गांजा, स्कूटी आणि रोकड असा एकूण १ लाख ६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकलेन अस्लम अंतुले (वय २९, सध्या रा. भोस्ते, जलालशहा मोहल्ला, ता. खेड) हा फुरुस येथील खेड-दापोली रस्त्याच्या कडेला गांजा बाळगलेल्या स्थितीत आढळून आला. तो गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याचा आरोप पोलिसांच्या तक्रारीत करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून १६ हजार रुपये किमतीचा ३२० ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा जप्त केला. याशिवाय ९० हजार रुपये किमतीची PRL Moon Stone Gray रंगाची सुझुकी कंपनीची Access 125 स्कूटी आणि ५० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ६ हजार ५० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यातील पोलीस शिपाई सोहेल इकबाल ढगे यांनी फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून सकलेन अंतुले याच्याविरोधात अंमली औषधी द्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(२)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४७ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलिसांकडून सुरू आहे.


