(देवळे / प्रकाश चाळके)
दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि सणाचा गोडवा सर्वांच्या आयुष्यात फुलावा, या सामाजिक भावनेतून युवासेना देवरुख शहराच्या वतीने अनाथाश्रम तसेच साहस संस्थेतील दिव्यांग मुलांसाठी दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. युवासेना प्रमुख अर्जुन राजेंद्र रेवणे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री उदय सामंत, लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत, युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य अपूर्वा सामंत आणि युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अनाथाश्रम आणि साहस संस्थेतील मुलांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या आनंदात या मुलांनाही सहभागी करून घेत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. समाजातील गरजू आणि विशेष मुलांसोबत सणाचा आनंद वाटून घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, देवरुख नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष वैभव पवार, ज्येष्ठ शिवसैनिक राजू रेवणे, नगरसेवक दीपक गेल्ये यांच्यासह रोशन रेवणे, सिद्धेश सुर्वे, नागेश कदम, उदय खांडेकर, ओंकार शिंदे, सिद्धू शेडगे, चिनू शिंदे, अमोल गायकर, शुभम केदारी आदी शिवसैनिक आणि युवासैनिक उपस्थित होते.
समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत गरजू आणि विशेष मुलांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी समाधानदायी ठरला. ‘समाजसेवेचा वसा, जनसेवेचा ध्यास’ हा मूलमंत्र जपत अर्जुन रेवणे यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.


