(रत्नागिरी / खेड)
खेड तालुक्यातील पोयनार लघुपाटबंधारे प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून रखडला होता. अखेर या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली असून, २६५ कोटी ४८ लाख रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रकल्पाचे भूमिपूजन महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते आज पोयनार येथे करण्यात आले. या प्रकल्पामुळे परिसरातील १४ गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, पुढील दोन वर्षांत गावांना प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे कदम यांनी सांगितले.
या वेळी बोलताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, पोयनार लघुपाटबंधारे प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता २७.८९९ दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील १४ गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. आता प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, आगामी दोन वर्षांत संबंधित सर्व गावांना पाणी उपलब्ध करून देणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
प्रकल्पासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले. कोकणातील सिंचन प्रकल्पांना गती देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगताना ते म्हणाले की, मांडवे धरणासाठीही सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतील रखडलेले जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला प्राधान्य
धरणाच्या बांधकामासोबतच प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे संरक्षण केले जाईल, अशी ग्वाहीही राज्यमंत्री कदम यांनी दिली. धरणाचे काम सुरू असतानाच बाधितांच्या पुनर्वसनाची प्रक्रियाही समांतरपणे राबविण्यात येईल. कोणत्याही शेतकऱ्यावर किंवा प्रकल्पग्रस्तावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या भूमिपूजन समारंभाला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, माजी गृहमंत्री रामदास कदम, माजी आमदार संजय कदम यांच्यासह विविध क्षेत्रांतील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.


