(मुंबई)
राज्यातील नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची २०१२ पासून यादीत बोगसपणे नोंद करून त्यांचे वेतन, भत्ते आणि इतर सुविधांमधून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या शैक्षणिक घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात केली.
दिवंगत अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर
या घोटाळ्यादरम्यान शिक्षण विभागातील दिवंगत अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या वापरून तब्बल २७०० बोगस भरती झाल्याचे उघड झाले आहे. ही भरती राज्यभर विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आली असून, त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती राज्यव्यापी आहे.
१९ जण अटकेत, चौकशी सुरू
भुसे यांनी विधानसभेत सांगितले की, या प्रकरणात एसआयटीमार्फत तपास सुरू असून, आतापर्यंत १९ जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींमध्ये शिक्षण विभागातील अधिकारी, काही संस्थाचालक यांचा समावेश आहे. “ज्या-j्या दोषी व्यक्ती यात सहभागी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणीही मोठा असला तरी गय केली जाणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
विधानसभा सदस्य प्रशांत बंब यांनी या प्रकरणातील गंभीरतेवर प्रकाश टाकत म्हटले की, “या गैरव्यवहारामुळे शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे. संबंधितांवर देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करा.” मालेगावचे सदस्य मुफ्ती यांनी तर आरोप केला की, “ही बोगस शिक्षक भरती २००९ पासून २०२५ पर्यंत सुरू होती. संबंधित सर्व दोषींना तात्काळ अटक करा आणि शासनाची फसवणूक करून घेतलेली कोट्यवधींची रक्कम वसूल करा.”
दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही
शिक्षणमंत्री भुसे यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, “सत्य व पारदर्शक तपासासाठी एसआयटी नियुक्त करण्यात आली असून, चौकशीत कोणतेही तथ्य लपवले जाणार नाही. कितीही मोठी व्यक्ती असली तरी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल,” अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.

