(नवी दिल्ली)
तळीरामांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे! भारतातील लोकप्रिय ‘इंद्री’ सिंगल माल्ट व्हिस्कीला आता मागे टाकत ‘ज्ञानचंद अदंबर’ या नव्या व्हिस्कीने पहिल्या क्रमांकाचे विजेतेपद पटकावले आहे. लास वेगासमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘आंतरराष्ट्रीय व्हिस्की स्पर्धेत’ (International Whisky Competition – IWC), जम्मूस्थित देवांस मॉडर्न ब्रुअरीज यांच्या ‘ज्ञानचंद अदंबर’ या सिंगल माल्टने दोन महत्त्वाचे पुरस्कार पटकावले – सर्वोत्कृष्ट भारतीय सिंगल माल्ट आणि सर्वोत्कृष्ट भारतीय व्हिस्की. यामुळे या नव्या व्हिस्कीने आपला जागतिक दर्जा सिद्ध केला आहे.
कंपनीचे अध्यक्ष प्रेम दिवाण म्हणाले, “हा सन्मान आमच्या पारंपरिक कौशल्याची आणि नव्या चवांच्या प्रयोगशीलतेची पावती आहे. ‘अदंबर’ आमच्या कठोर परिश्रमांना योग्य ओळख देतो.” अदंबर’ ही नॉन-पीटेड सिंगल माल्ट व्हिस्की असून, ती अमेरिकन एक्स-बॉर्बन ओक कॅस्कमध्ये परिपक्व केली जाते. तिच्या चवेत वाळवलेली जर्दाळू, मध, टोस्ट केलेले मसाले आणि कॅरॅमल यांचे उत्तम संतुलन आहे. यामुळे परीक्षकांनी तिला उच्च श्रेणी दिली. ‘अदंबर’ ही ज्ञानचंद इंडियन सिंगल माल्ट सीरिजमधील नवी व्हर्जन आहे. याआधी ‘ज्ञानचंद’ व्हिस्कीला भारतात चांगला प्रतिसाद मिळाल्याचा अनुभव कंपनीला आहे.
जगप्रसिद्ध व्हिस्की समीक्षक जिम मरे यांनी ‘अदंबर’चे कौतुक करताना म्हटले, “ही व्हिस्की चवीलाच नव्हे तर अनुभवालाही विलक्षण आहे. स्कॉटिश माल्टप्रमाणे अनुभव देणारी ही आतापर्यंतची सर्वोत्तम भारतीय सिंगल माल्ट आहे. चव घेतल्यावर क्षणभर वाटलं, ‘ही खरंच भारतीय व्हिस्की आहे का?’”
सध्या ‘अदंबर’ ही फक्त दिल्ली आणि हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील ड्युटी-फ्री स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. मात्र, लवकरच ती किरकोळ बाजारातही उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. ही व्हिस्की जम्मू येथे डिस्टिल आणि पॅक केली जाते.